शिराळ्यात विधानसभेसाठी नेत्यांचा उतावीळपणा-जयंत पाटील यांना चितपट करण्याची रणनीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 01:03 AM2018-03-28T01:03:14+5:302018-03-28T01:03:14+5:30

 Utilization of Leaders for the Legislative Assembly in Venal - The Strategy Strategy for Jayant Patil | शिराळ्यात विधानसभेसाठी नेत्यांचा उतावीळपणा-जयंत पाटील यांना चितपट करण्याची रणनीती

शिराळ्यात विधानसभेसाठी नेत्यांचा उतावीळपणा-जयंत पाटील यांना चितपट करण्याची रणनीती

Next
ठळक मुद्देलढतीत नवे रंग : इस्लामपुरातही युवा नेते सरसावले;

अशोक पाटील ।
इस्लामपूर : विधानसभेच्या इस्लामपूर मतदारसंघात आमदार जयंत पाटील यांना चितपट करायचेच, असा चंग विरोधकांतील युवा नेत्यांनी बांधला आहे, तर शिराळ्यात आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि सत्यजित देशमुख या तिन्ही नेत्यांच्या राजकारणाला सुरुंग लावण्यासाठी सम्राट महाडिक सरसावले आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीला वर्षभराचा कालावधी आहे. मात्र, काही नेते आतापासूनच उतावीळ झाले आहेत.
आमदार जयंत पाटील समर्थकांना आजही इस्लामपूर राष्ट्रवादीसाठी सुरक्षित असल्याचे वाटते. मात्र जयंतराव भाजपच्या हिटलिस्टवर आहेत. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये आलेले नगराध्यक्ष निशिकांत पाटील, वैभव शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील यांनी आगामी निवडणुकीत जयंतरावांचा पाडाव करायचाच, या हेतूने मतदार संघात संपर्क ठेवला आहे, तर वाळवा पंचायत समिती सदस्य राहुल महाडिक यांनीही जयंतरावविरोधी भूमिका मांडून इस्लामपूर मतदारसंघात शड्डू ठोकला आहे.

शिराळा मतदारसंघात आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांना नानासाहेब महाडिक यांची साथ नेहमीच मोलाची ठरली आहे. मात्र या तिघांच्या भूमिकेमुळे काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांच्या पदरात काहीही पडलेले नाही. असे असूनही देशमुख पिता - पुत्रांनी काँग्रेसवरील निष्ठा ढळू दिलेली नाही. काँग्रेस आघाडीचे निर्णय अंतिम मानून ते विधानसभा निवडणुकीत कार्यरत असतात, परंतु राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक मात्र या भूमिकेत नाहीत.
मागील पराजयाचा वचपा काढण्यासाठी मानसिंगराव तयारीला लागले आहेत. याउलट कॉँग्रेस आघाडीबाबत सत्यजित देशमुख मौन पाळून आहेत.

शिराळा मतदारसंघात मानसिंगराव नाईक आणि सत्यजित देशमुख यांच्या युतीला हादरा देण्यासाठी भाजपचे आमदार नाईक यांनी रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांची ऊर्जा वापरण्यावर भर दिला आहे; तर दुसऱ्या बाजूला त्यांच्याच आघाडीतील माजी जिल्हा परिषद सदस्य, महाडिक युवा शक्तीचे संस्थापक सम्राट महाडिक यांनी आगामी निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे शिवाजीराव नाईक, सदाभाऊ खोत अस्वस्थ झाले आहेत; तर मानसिंगराव नाईक यांच्या गटात मात्र आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या आहेत. त्यातून आतापासूनच अनेक इच्छुकांनी तयारी सुरू करून उतावीळपणा दाखवण्यास सुरुवात केली आहे.

Web Title:  Utilization of Leaders for the Legislative Assembly in Venal - The Strategy Strategy for Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.