महाडिक शैक्षणिक संकुल परिसरात विद्यार्थांचे लसीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:21 AM2021-05-30T04:21:49+5:302021-05-30T04:21:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : विद्यार्थ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण महाविद्यालयालगतच्या प्राथमिक आरोग्य केंद्राने प्राधान्याने करून घ्यावे. त्यांना त्यांच्या गावातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : विद्यार्थ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण महाविद्यालयालगतच्या प्राथमिक आरोग्य केंद्राने प्राधान्याने करून घ्यावे. त्यांना त्यांच्या गावातील आरोग्य केंद्रावर लस देण्यापेक्षा महाविद्यालय परिसरात असलेल्या आरोग्य केंद्रावर लस देणे सोयीचे होईल, असे निवेदन श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक प्रा. महेश जोशी यांनी पेठ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वृषाली देवापुरे यांना दिले.
महाडिक शैक्षणिक संकुलात सुमारे ३,७०० विद्यार्थी, ३०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत. हे सर्व विद्यार्थी मुख्यत: वाळवा, शिराळा व कऱ्हाड तालुक्यातील आहेत. त्यांना त्यांच्या गावामध्ये लस मिळण्यास अडचण येत आहे. यामधील १८ वर्षांवरील सुमारे दोन हजार विद्यार्थी व ३०० स्टाफचे लसीकरण संबंधित महाविद्यालयात अथवा पेठ येथील प्राथमिक आरोग्य केंदात करण्याचा संस्थेचा मानस आहे. जेणेकरून भविष्यामध्ये लवकरात लवकर महाविद्यालय सुरु करणे सुरक्षित राहील. यासाठी लागणारी मदत महाविद्यालयामार्फत देऊ. दररोज ५० किंवा १०० जणांचे लसीकरण करून घेण्याची विनंती या निवेदनामध्ये करण्यात आली आहे. यावेळी नानासाहेब महाडिक पॉलिटेक्निकचे उपप्राचार्य प्रा. चंद्रकांत पाटील, आनंदा माळी, जीवन पवार उपस्थित होते.