सांगली जिल्ह्यात गोवर, रूबेला रोगांवर मात करण्यासाठी लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 11:45 AM2018-08-29T11:45:07+5:302018-08-29T11:49:35+5:30
गोवर व रूबेला रोगांवर नियंत्रण व त्यांचे उच्चाटन करण्यासाठी सांगली जिल्ह्यात 14 नोव्हेंबरपासून लसीकरण मोहीम हाती घेण्यात येत आहे
सांगली : गोवर व रूबेला रोगांवर नियंत्रण व त्यांचे उच्चाटन करण्यासाठी सांगली जिल्ह्यात 14 नोव्हेंबरपासून लसीकरण मोहीम हाती घेण्यात येत आहे. या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्यात एकही मूल लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवून एकत्रित प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी येथे दिले.
गोवर व रूबेला लसीकरण मोहिमेच्या जिल्हा समन्वय समितीच्या सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समिती सभागृहात आयोजित या सभेस महापौर संगीता खोत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे डॉ. भूपाल गिरीगोसावी, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. हेमंत खरनारे, डॉ. काजल श्रीवास्तव, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, गोवर हा अत्यंत संक्रामक, घातक आणि विषाणूजन्य आजार आहे. या आजारामुळे दरवर्षी भारतात 49 हजारहून अधिक मुले मृत्युमुखी पडतात.
रूबेला हा आजार बालकांबरोबरच प्रौढ व्यक्तींनाही होतो. त्यावर मात करण्यासाठी 14 नोव्हेंबरपासून हाती घेण्यात येणारी गोवर व रूबेला लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवावी. त्यासाठी जास्तीत जास्त जनजागृती करा. या माध्यमातून लस न दिल्याने होणारे दुष्परिणाम टाळता येऊ शकतील.
गोवर व रूबेला लसीकरण मोहीम आतापर्यंत 21 राज्यात यशस्वीपणे राबवली आहे. ही मोहीम राबवणारे महाराष्ट्र हे 22 वे राज्य आहे, असे सांगून जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, बालवयात होणारे रोग टाळण्याच्या सर्वात प्रभावी मार्गापैकी लसीकरण आहे.
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु झाल्याने लसीकरणाद्वारे टाळता येऊ शकणाऱ्या रोगांना थोपवणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यात महत्वाचे यश मिळाले आहे.
सन 2020 पर्यंत लसीकरणाद्वारे गोवर रोगाचे उच्चाटन आणि रूबेला रोगावर नियंत्रण ठेवण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी 14 नोव्हेंबरपासून 5 आठवडे ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये 9 महिने ते 15 वर्षे वयातील सर्वांना एकाच लसीद्वारे गोवर व रूबेला या 2 रोगांवर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, या मोहिमेअंतर्गत 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील भारतात 40 कोटी 20 लाख बालकांना तर महाराष्ट्रात 3 कोटी 70 लाख बालकाना लस देण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यात एकूण 8 लाख 24 हजार 850 लाभार्थी अपेक्षित आहेत.
यामध्ये ग्रामीण भागात 6 लाख, 16 हजार 279, शहरी भागात 57 हजार 275 आणि महानगरपालिका क्षेत्रात 1 लाख 51 हजार 296 लाभार्थी अपेक्षित आहेत. यासाठी 2 हजार 976 शाळा, 2 हजार 981 अंगणवाड्या आणि 13 हजार 151 नियमित आरोग्य सेवा सत्रांची ठिकाणे निवडली आहेत.
यासाठी आरोग्य विभागाबरोबरच शिक्षण, महिला व बालकल्याण, गृह, अल्पसंख्याक विभाग, वैद्यकीय महाविद्यालये, इंडियन मेडिकल असोसिएशन, रोटरी क्लब यासारख्या स्वयंसेवी संस्था यांनीही परस्पर समन्वय घेऊन ही मोहीम यशस्वी करावी. यासाठी आरोग्य अधिकारी, संबंधित इतर विभाग आणि महानगरपालिका आरोग्य अधिकाऱ्यांची स्वतंत्र कार्यशाळा घेण्यात येणार आहे.
यावेळी महापौर संगिता खोत यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. हेमंत खरनारे, डॉ. काजल श्रीवास्तव यांनी याबाबत सविस्तर माहिती देवून शंकांचे निरसन केले. डॉ. संजय साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्ह्यातील संबंधित विविध विभागांचे अधिकारी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.