इस्लामपुरात परजिल्ह्यांतील नागरिकांचे होतेय लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:27 AM2021-05-11T04:27:30+5:302021-05-11T04:27:30+5:30
इस्लामपूर : कोरोना प्रतिबंधक लस मिळण्याबाबत गोंधळ सुरू असतानाच येथील उपजिल्हा रुग्णालयात रविवारी कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील दीडशेहून अधिक ...
इस्लामपूर : कोरोना प्रतिबंधक लस मिळण्याबाबत गोंधळ सुरू असतानाच येथील उपजिल्हा रुग्णालयात रविवारी कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील दीडशेहून अधिक नागरिकांनी येऊन लसीकरण करून घेतले. त्यामुळे स्थानिक नागरिकांना लसीची प्रतीक्षा करत बसावे लागत आहे. सध्या शासनाने लागू केलेल्या जिल्हाबंदीचा भंग करत हे बाहेरील जिल्ह्यांतील नागरिक खुलेआम येत असल्याने प्रशासनाचा कोणताही वचक नसल्याचे स्पष्ट होत आहे.
कोरोनाची लस घेण्यासाठी ऑनलाईन नावनोंदणी करणे बंधनकारक केल्याने हा सर्व घोळ उद्भवल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. केंद्र शासनाच्या स्तरावरून याबाबत अॅपचे नियोजन होण्याची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे. शासनाकडून लसींचा पुरवठा करण्याबाबतचे धोरणही अपुरे पडत असल्याने जिल्ह्याला चार-चार दिवस लस मिळत नाही, अशी परिस्थिती आहे.
येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑनलाईन नोंदणी करून लसीकरणाची वेळ मिळालेल्या नागरिकांना लस देण्यात येते. दर दिवशी दोनशेजणांना लस देण्याचे उद्दिष्ट असते. या लसीकरणासाठी बाहेरील जिल्ह्यांतील नागरिक मोठ्या प्रमाणावर नोेंदणी करून घेत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना या लसीकरणाचा लाभ मिळत नाही. त्यामुळे शासनाने जिल्हानिहाय अथवा तालुकानिहाय नावनोंदणीचा पर्याय या अॅपमध्ये उपलब्ध करून दिला पाहिजे, अशी मागणी होत आहे.
चौकट
गंभीर दखल घेण्याची गरज
येथील उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी झालेल्या लसीकरणावेळी सातारा जिल्ह्यातील २८, कोल्हापूर जिल्ह्यातील ५२ आणि मूळ राजस्थानचे रहिवासी मात्र सध्या जयसिंगपुरात वास्तव्यास असणाऱ्या ३३ जणांनी जिल्हाबंदीचा आदेश मोडत लसीकरण करून घेतल्याचे येथील नोंदणी दप्तरावरून स्पष्ट झाले आहे. प्रशासनाने या बाबीची गंभीरपणे दखल घ्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.