Corona vaccine Sangli :अठरा वर्षावरील लसीकरण लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 06:01 PM2021-04-28T18:01:48+5:302021-04-28T18:05:25+5:30
Corona vaccine Sangli : शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त होत नाहीत तो पर्यंत 18 वर्षावरील लसीकरण करता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी 1 मे पासून 18 वर्षावरील लसीकरणासाठी गर्दी करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केले.
सांगली : 1 मे पासून 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यात येणार होते. कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार होती. तथापि, सध्यस्थितीत लसींच्या उलब्धतेबाबतची मर्यादा लक्षात घेता. जो पर्यंत लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होत नाही. तसेच याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त होत नाहीत तो पर्यंत 18 वर्षावरील लसीकरण करता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी 1 मे पासून 18 वर्षावरील लसीकरणासाठी गर्दी करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केले.
18 वर्षे वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी सदरची माहिती दिली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलीद पोरे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गावडे उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सध्या 45 वर्षावरील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु असून ज्यांना पहिला डोस दिला आहे. त्यांचा दुसरा डोस विहित वेळेत देण्यात येत आहे. यावयोगटातील नागरीकांचे लसीकरण पुर्वीप्रमाणे सुरु राहील. 18 वर्षावरील वयोगटातील नागरिकांसाठीच्या लसीकरणासाठी पुरेशा प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध झाल्यावर तसेच याबाबतच्या शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यावर या वयोगटालाही तात्काळ लसीकरण करण्यात येईल तो पर्यंत या वयोगटातील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून या महामारीच्या काळात सेवा बजावत आहेत याची जाणिव प्रत्येक नागरीकांनी ठेवली पाहिजे. अशा कर्मचाऱ्याबरोबर, वाद घालणे, हुज्जत घालणे, अपमानास्पद वागणूक देणे, तुच्छतेने बोलणे असे प्रकार केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
जिल्ह्याला नव्याने 45 व्हेंन्टीलेटर प्राप्त
जिल्ह्याला सध्या 45 व्हेंटीलेटर नव्याने प्राप्त झाले असून यापैकी 25 व्हेंन्टीलेटर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास देण्यात येणार उर्वरीत 20 व्हेंन्टीलेटर जिल्ह्यातील रुग्णालयांना वितरीत करण्यात येणार आहेत. सध्या जिल्ह्यात 35 ते 40 टन ऑक्सिजन वापरात येते आवश्यकतेनुसार साठा जेमतेम उलब्ध करुन घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यावेळी म्हणाले, जिल्ह्यात आतापर्यंत 5 लाख 36 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून 45 वर्षावरील वयोगटातील नागरिकांचे 75 टक्के लसीकरण झाले आहे. लस टंचाईमुळे 18 वर्षावरील नागरिकांना 1 मे पासून करण्यात येणारे लसीकरण पुढे जाण्याची शक्यता असून या वयोगटातील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी त्यांनी या वयोगटासाठी ऑनसाईट रजिस्ट्रेशन ऐवजी प्री रजिस्ट्रेशची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून ग्रामपंचायत स्तरावर रजिस्ट्रेशन होणार आहे. गावाला जेवढ्या प्रमाणात लसीचा पुरवठा होणार आहे. त्याप्रमाणात लसीकरण केले जाणार आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी करुन नये. रजिस्ट्रेशन प्रक्रियेत शिक्षकांनी खुप मोठी भूमिका बजावल्याचेही त्यांनी सांगितले.
झपाट्याने वाढत असलेली रुग्णसंख्या कमी करण्यासाठी ग्राम दक्षता समित्यांनी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या लसीकरण केंद्रावर 45 वर्षावरील नागरिकांना लसीकरण सुरु आहे. लसीकरण प्रक्रिया पुर्वीप्रमाणेच सुरु राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ग्रामीण भागात कोरोनाला रोखण्यासाठी ग्राम दक्षता समित्यांनी प्रसंगानुरुप कठोर भूमिका घेवून कंन्टेमेंट झोन प्रक्रिया राबविण्याची अंमलबजावणी करावी असेही ते यावेळी म्हणाले.
दिनांक 28 एप्रिल 2021 रोजी लसीचा पुरवठा झाला नसल्यामुळे दिनांक 29 एप्रिल रोजीही लसीकरण बंद राहील. लोकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये. असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.