लस संपली, आज लसीकरण होणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:28 AM2021-05-08T04:28:00+5:302021-05-08T04:28:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यातील कोरोना लसीचा साठा शुक्रवारी संपला. त्यामुळे शनिवारी लसीकरण बंद राहणार आहे. १८ ते ...
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यातील कोरोना लसीचा साठा शुक्रवारी संपला. त्यामुळे शनिवारी लसीकरण बंद राहणार आहे. १८ ते ४४ वयोगटांसाठीची लस शिल्लक असून त्यांचे लसीकरण मात्र सुरुच राहणार आहे.
गुरुवारी रात्री पुण्यातून मिळालेले दहा हजार डोस शुक्रवारी दिवसभरात संपले. आज फक्त ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. दिवसभरात ७ हजार ८४२ जणांचे दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण झाले. यामध्ये साठ वर्षांवरील नागरिकांची संख्या लक्षणीय म्हणजे ४ हजार ८९७ इतकी होती. महापालिकेला अवघे १ हजार ९०० डोस मिळाले होते, त्यामुळे सर्वच आरोग्य केंद्रांमध्ये ११ वाजेपर्यंत लसीकरण आटोपले होते. नोंदणी केलेल्या नागरिकांना बोलावून घेण्यात आले. बारानंतर सर्वच केंद्रांवर लसीकरण थंडावल्याचे दिसले. जिल्हाभरातील पाच केंद्रांवर १८ ते ४४ वर्षे वयोगटांचे लसीकरण मात्र अखंडित सुरू आहे. शनिवारी, रविवारीही सुरू राहील.
चौकट
१८ ते ४४ गटांसाठी केंद्रे वाढविणार
१८ ते ४४ वर्षे वयोगटांसाठी सध्या सांगलीत जामवाडी, मिरजेत समतानगर तसेच कवलापूर, विटा व इस्लामपुरात लसीकरण सुरू आहे. या केंद्रांची संख्या वाढविणार असल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले. या गटासाठी सुमारे ८ हजारांहून अधिक डोस उपलब्ध आहेत. पोर्टलवर नोंदणीनंतरच लस मिळणार आहे.
चौकट
शुक्रवारचे लसीकरण असे
पहिला डोस - १,७७८
दुसरा डोस - ७,८४२
एकूण - ९६२०
आजअखेर एकूण - ५,९५,७२६