लसच प्रभावी, लसीकरणानंतर जिल्ह्यात एकही मृत्यू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:26 AM2021-04-24T04:26:45+5:302021-04-24T04:26:45+5:30
सांगली : जिल्ह्यातील ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सहा लाख ३० हजार लाभार्थींपैकी चार लाख ७३ हजार ५१९ जणांचे लसीकरण ...
सांगली : जिल्ह्यातील ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सहा लाख ३० हजार लाभार्थींपैकी चार लाख ७३ हजार ५१९ जणांचे लसीकरण गुरुवारअखेर पूर्ण झाले. हे प्रमाण ७५.१६ टक्के आहे. चार लाख ३४ हजार २२९ जणांना पहिला डोस, तर ३९ हजार २९० जणांना दुसरा डोस दिला आहे. लस घेतलेल्यांपैकी एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही, असा दावा जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केला आहे. तसेच नागरिकांमध्ये कोरोना लस घेण्याबाबत जागृती निर्माण झाल्यामुळे लसीकरणाचा टक्का गतीने वाढला आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरण जिल्ह्यात प्रभावी ठरत आहे. लस दिलेल्या व्यक्तींना कोरोना झालाच तर धोक्का कमी आहे, असे डॉ. विवेक पाटील यांनी दावा आहे. ग्रामीण भागामध्ये लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये मतमतांतर होते. पण, लसीकरण झालेल्या व्यक्तींचा अनुभव पाहिल्यानंतर लसीकरणाबाबत लोकांच्या मनातील भीती कमी होत आहे. यामुळेच मागील आठवड्यापासून लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी होत आहे. जिल्ह्यातील ४५ पेक्षा जास्त वयाच्या ७५.१६ टक्के व्यक्तींचे लसीकरण झाले आहे. लसीकरण झालेल्यांपैकी पहिला डोस झालेल्या २० व्यक्तींना कोराना झाला, तर दोन डोस घेतलेल्या एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही, असे आरोग्य विभागाने सांगितले. लस प्रभावी ठरत असल्यामुळे ४५ वयापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींचे येत्या आठवड्यात १०० टक्के लसीकरण होणार आहे. केंद्र सरकारने १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लस देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या वयोगटातील सांगली जिल्ह्यात १७ लाख ६० हजार नागरिकांची संख्या असून, त्यांचे लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन पूर्ण केले आहे.
चौकट
पहिल्या डोसनंतर २० व्यक्तींनाच कोरोना
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोनाचे लसीकरण सुरू आहे. १४ फेब्रुवारीपासून दुसरा डोसही सुरू झाला आहे. लस घेतलेल्यांपैकी २० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला; पण त्यांचा दुसरा डोस अद्याप पूर्ण झालेला नव्हता. अर्थात लस घेतल्यानंतरही काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत आहे.
कोट
जिल्ह्यात लसीकरणाचा वेग चांगला आहे. पण, लस उपलब्ध होण्यात अडचणी जास्त आहेत. लसीकरणाचा पहिला डोस दिल्यानंतर काही किरकोळ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. कारण, लसीकरणापूर्वीच हे लोक कोरोनाबांधित होते. पण, लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींना कोरोना झाल्याची माहिती समोर आली नाही. लस घेतल्यानंतर बेफिकिरी न बाळगता मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सिंग याची दक्षता घेतलीच पाहिजे.
-डॉ. विवेक पाटील, लसीकरण अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली
चौकट
जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्ण : ६५,५५७
कोरोनामुक्त संख्या : ५३,७६९
कोरोनाने मृत्युसंख्या : २०१०
दोन्ही डोस घेतलेली संख्या : ३९,२९०
केवळ पहिला डोस घेतलेल्यांची संख्या : ४,३४,२२९
आतापर्यंत किती जणाला लस दिली : ४,७३,५१९
चौकट
पहिला, दुसरा डोस घेतल्यानंतर धोका कमी
जिल्ह्यातील ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सहा लाख ३० हजार लाभार्थींपैकी चार लाख ७३ हजार ५१९ जणांचे लसीकरण गुरुवारअखेर पूर्ण झाले. हे प्रमाण ७५.१६ टक्के आहे. चार लाख ३४ हजार २२९ जणांना पहिला डोस, तर ३९ हजार २९० जणांना दुसरा डोस दिला आहे. लसीचा पहिला डोस घेतलेल्यापैकी २० जणांना कोरोना झाला असून, ते उपचारानंतर बरे झाले आहेत. लसीचा दुसरा डोस घेतलेल्यापैकी एकालाही कोरोना झाला नाही, असा दावा आरोग्य विभागाने केला आहे.