Valentine Day: संकटांनी दरीत ढकलले, पण जिद्दीने शिखरावर पोहोचवले!; पुण्यातील दिव्यांगांची प्रेरणादायी कहाणी
By अविनाश कोळी | Published: February 14, 2023 12:05 PM2023-02-14T12:05:35+5:302023-02-14T12:05:46+5:30
जर्मन बेकरीतील बाॅम्बस्फोटाने युवतीच्या शरीराची चाळण झाली, तर डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारपद्धतीने तरुणाला पक्षाघात झाला.
अविनाश कोळी
सांगली : जर्मन बेकरीतील बाॅम्बस्फोटाने युवतीच्या शरीराची चाळण झाली, तर डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारपद्धतीने तरुणाला पक्षाघात झाला. संकटांच्या दोन वेगळ्या तऱ्हा, पण जगण्याचा लढा, जिंकण्याची जिद्द सारखीच. त्यातून पुण्यातील दोन दिव्यांगांनी प्रेरणादायी कहाणी जन्माला घातली. थक्क करणाऱ्या त्यांच्या या संघर्षाला, त्यातून मिळविलेल्या यशाला व समाजासाठी दिलेल्या योगदानाला सांगलीकरांनी नुकताच सलाम केला.
सांगलीच्या अपंग सेवा केंद्राच्या वतीने प्रेरणादायी कहाणी असलेल्या दिव्यांगांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यात पुण्यातील आम्रपाली चव्हाण व अनिकेत जगताप या दोन दिव्यांगांच्या कहाणीने साऱ्यांनाच हादरवले, पण त्यांच्या कार्याचा गौरव करतानाच अनेकांना जीवन जगण्याचा मंत्र मिळाला.
१३ फेब्रुवारी २०१० रोजी जर्मन बेकरीत कॉफीचा घोट घेणाऱ्या आम्रपालीच्या शरीराचा घोट मोठ्या बाॅम्बस्फोटाने घेतला. आज या घटनेला १३ वर्षे पूर्ण झाली. एका तपाचा तिचा संघर्ष म्हणजे जगण्याच्या लढाईचा थरारपटच. बॉम्बच्या छऱ्यांनी शरीराची चाळण केली. सात शस्त्रक्रिया, तीनशेहून अधिक शस्त्रक्रियेशिवाय झालेल्या उपचार पद्धतींचा सामना तिला करावा लागला.
अनेक वर्षांच्या वैद्यकीय उपचारानंतर ती सावरली. जगण्याची शर्यत जिंकताना समाजातील अन्य घटकांनाही जगण्याचा मंत्र देण्यासाठी ती उभी राहिली. प्रेरणादायी, सकारात्मक भाषणातून तिने अनेकांना जगण्याची ऊर्जा दिली. ‘पीस असोसिएशन’ची स्थापना, ‘वुई पुणेकर’चे सदस्य होऊन तिने समाजकार्यात झोकून दिले.
अपंगत्व सोबतीला घेऊन तो धावतोय...
पुणे जिल्ह्यातीलच खामगाव (ता. दौंड) येथील अनिकेत जगताप याचीही कहाणी थक्क करणारी. वयाच्या पाचव्या वर्षी ताप आल्यानंतर चुकीचे निदान करून डॉक्टरांनी दिलेल्या इंजेक्शनने त्याला पक्षाघात झाला. दोन्ही हात, पाय, मानेच्या हालचाली थांबल्या. हे अपंगत्वाचे जगणे त्याला मान्य नव्हते. त्याला टक्कर देत सामान्य शाळेत शिकत त्याने बी. टेक. केले. आयटी कंपनी स्थापन केली. चाळीसहून अधिक देशांशी तो सध्या व्यवहार करतोय. अनेक लोकांना त्याने रोजगार दिला. कंपनी १०० कोटींवर नेऊन शेकडो तरुणांना नोकऱ्या देण्याचे स्वप्न बाळगून त्यामागे तो धावतोय.