Valentine Day : सांगलीत ‘व्हॅलेंटाईन डे’वर मंदीचे सावट, फुले, भेटवस्तू यांना कमी मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 05:41 PM2018-02-14T17:41:06+5:302018-02-14T17:45:27+5:30
मंदीला कवेत घेऊन महागाईप्रती प्रेमगीत गात यंदाचा ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा होणार आहे. दरवर्षी येणारा प्रेमाचा बहर यंदा मंदीच्या सावटाखाली कोमेजून गेल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या पाच वर्षात यावर्षी फुले, भेटवस्तू यांना सर्वात कमी मागणी असल्याची माहिती सांगलीतील विक्रेत्यांनी दिली.
सांगली : मंदीला कवेत घेऊन महागाईप्रती प्रेमगीत गात यंदाचा ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा होणार आहे. दरवर्षी येणारा प्रेमाचा बहर यंदा मंदीच्या सावटाखाली कोमेजून गेल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या पाच वर्षात यावर्षी फुले, भेटवस्तू यांना सर्वात कमी मागणी असल्याची माहिती सांगलीतील विक्रेत्यांनी दिली.
‘व्हॅलेंटाईन डे’ साठी यंदा भेटवस्तूंमध्ये टेडी, म्युझिकल डोम, लायटिंग डोम, मेसेज इन बॉटल, ओरियन लॉकेटस्, गोल्डन रोज, कपल स्टॅच्यू, पॉप-अप कार्ड, ख्र्रिस्टलचे लव्ह कोटेशन्स्, स्मॉल किचैन टेडी, कोरियन लॉकेटस्, रिंग्ज, इअर रिंग्ज आदी वस्तू दाखल झाल्या आहेत. यातील चोवीस कॅरेट गोल्डन रोझला सर्वाधिक मागणी दिसून येते.
‘व्हॅलेंटाईन डे’साठी अनेक प्रकारचे चॉकलेटस् दाखल झाले आहेत. यामध्ये ३५ रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंतची व्हरायटी पाहायला मिळते. चॉकलेटवर सोशल मीडियाचा प्रभाव दिसून येत आहे.
यंदा स्माईली इमोजी स्टाईलचे चॉकलेटस आली आहेत. याची २0 रुपये किंमत आहे. चॉकलेट बास्केट, शॅम्पेन चॉकलेट, रोज चॉकलेट, हार्टशेप चॉकलेट असे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. मोबाईलच्या युगात गेल्या काही वर्षांपासून ग्रिटिंग्ज कार्डना मागणी घटली असली तरी, यंदा पॉप-अप प्रकारातील ग्रिटिंग कार्डची चलती आहे.
फुलांचा दर स्थिर
व्हॅलेंटाईन डे आणि डच गुलाबाचे घट्ट नाते गेल्या काही वर्षात निर्माण झाले आहे. दरवर्षी या दिनाच्या निमित्ताने डच गुलाबाचा भाव वधारतो. यंदा सांगलीत त्याचे दर स्थिर राहिले आहेत. डच गुलाबाचा दर मंगळवारी प्रतिनगर २0 ते २५ रुपये इतका, तर जरबेराचा दर १0 ते १५ रुपये होता.
व्हॅलेंटाईन डे निमित्ताने अनेक प्रकारच्या भेटवस्तू आमच्याकडे उपलब्ध झाल्या असल्या तरी, मागणी फारशी नसल्याचे दिसत आहे. गेल्या दोन वर्षांपासूनची ही स्थिती आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी बुधवारी मागणी वाढेल, अशी अपेक्षा आहे.
- संदीप सकळे,
भेटवस्तू विक्रेते, सांगली