मेणी खोऱ्यात बिबट्याचा वावर - वन विभागाने लावले फलक जागोजागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 10:04 PM2020-05-26T22:04:26+5:302020-05-26T22:05:46+5:30
चरण येथील शेतकऱ्याला बिबट्याने जखमीही केले आहे. बिबट्याचा वावर व हल्ले याबाबत शिराळा वन विभाग दक्षता घेत आहेच. जेथे हल्ले होत आहेत, त्या ठिकाणी तातडीने धाव घेऊन उपाययोजना केल्या जात आहेत.
सहदेव खोत ।
पुनवत : शिराळा तालुक्याच्या अनेक भागात बिबट्याचा वावर व पाळीव प्राण्यांवर हल्ल्याचे प्रकार घडत आहेत. वन विभागाने बिबट्याच्या सध्याच्या वावराची ठिकाणे निश्चित करून येथे ‘बिबट्या प्रवण क्षेत्र’ असे फलक लावून नागरिकांना खबरदारीचे आवाहन केले आहे.
शिराळा तालुक्यात मेणी खोरे, चरण, वाकुर्डे, बिळाशी, कुसाईवाडी, अंत्री, बिऊर, कांदे, मांगले आदी भागात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. या सर्व भागात बिबट्याकडून शेळ्या, जनावरांवर हल्ले झाले आहेत. यात काही प्राणी दगावलेही आहेत. नुकतेच चरण येथील शेतकऱ्याला बिबट्याने जखमीही केले आहे. बिबट्याचा वावर व हल्ले याबाबत शिराळा वन विभाग दक्षता घेत आहेच. जेथे हल्ले होत आहेत, त्या ठिकाणी तातडीने धाव घेऊन उपाययोजना केल्या जात आहेत. सध्या बिबट्याचा वावर असलेल्या अंत्री बुद्रुक, वाकुर्डे बुद्रुक, पडवळवाडी, कुसाईवाडी आदी ठिकाणी वन विभागाने ‘बिबट्या प्रवण क्षेत्र’ म्हणून फलक लावले आहेत. नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
अफवा नकोत
बिबट्याचा वावर व हल्ले याबाबत सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट किंवा व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरते. बिबट्याबाबत कुणीही चुकीच्या पोस्ट व्हायरल करू नयेत, असे शिराळा वन विभागाने स्पष्ट केले.
तालुक्याच्या काही भागात बिबट्याचा वावर आहे. बिबट्याचे सहजीवन नागरिकांनी समजावून घ्यावे. पाळीव प्राण्यांसह अनेक प्राणी बिबट्याचे भक्ष्य आहे. तो मनुष्यावर मुद्दाम हल्ला करत नाही. शेतात जाताना लोकांनी योग्य खबरदारी घ्यावी. वन विभागाशी संपर्क करावा.
-सुशांत काळे, वनक्षेत्रपाल, शिराळा