वाळवा तालुक्यात कोरोना रुग्णांच्या माना सुरी घेऊन बसलेल्या खासगी रुग्णालयांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:27 AM2021-05-20T04:27:49+5:302021-05-20T04:27:49+5:30
इस्लामपूर : वाळवा तालुक्यात आजअखेर २ हजार ३२१ इतकी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे. त्यातील १ हजार ८१३ रुग्ण घरीच ...
इस्लामपूर : वाळवा तालुक्यात आजअखेर २ हजार ३२१ इतकी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे. त्यातील १ हजार ८१३ रुग्ण घरीच विलगीकरणात उपचार घेत आहेत. तर ४९७ रुग्ण तालुक्यातील १८ कोविड उपचार केंद्रांमध्ये प्रत्यक्ष उपचार घेत आहेत. ११ रुग्ण तालुक्याबाहेर उपचार घेत आहेत. इस्लामपूर आणि आष्टा येथील शासकीय रुग्णालयांकडे १० अतिदक्षता तर ५५ ऑक्सिजन बेडची तोकडी व्यवस्था आहे. उर्वरित खासगी रुग्णालयांमध्ये १६५ आयसीयू बेड तर ५२४ ऑक्सिजन वॉर्ड बेडची सुविधा असल्याने कोरोना रुग्णांना आपला जीव मुठीत धरून हातात सुरी घेऊन बसलेल्या खासगी रुग्णालयांच्या ताब्यात आपली मान द्यावी लागत असल्याचे विदारक चित्र आहे.
कृष्णा-वारणा नदीच्या पट्ट्यातील सधन तालुका म्हणून वाळवा तालुक्याची ओळख असली तरी कोरोना महामारीच्या निमित्ताने येथील आरोग्य व्यवस्था कमालीची तोकडी असल्याचे स्पष्ट झाले आहे. इस्लामपूरच्या उपजिल्हा रुग्णालयातील आयसीयूचे केवळ १० बेड हीच इथल्या आरोग्य व्यवस्थेची लुळी-पांगळी अवस्था दाखविणारी आहे. तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांच्या बाधित होण्याचा दर हा ३० टक्क्यांपर्यंत गेला आहे. त्यामुळे या सर्व रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था इथल्या शासकीय आरोग्य यंत्रणेकडे नसल्याचे स्पष्ट होत आहे.
वाळवा तालुक्यात इस्लामपूर आणि आष्ट्यासह एकूण १७ कोविड उपचार केंद्रे आहेत. त्यामध्ये १८५ आयसीयू बेडस् आणि ५२४ वॉर्ड बेडस् अशी एकूण ७०९ बेडची व्यवस्था आहे. आजअखेर अतिदक्षता विभागात १७० रुग्ण तर वॉर्डमध्ये २९० रुग्ण उपचार घेत आहेत. मोठ्या प्रमाणात घरीच विलगीकरणात असणारे रुग्ण हे कोविड नियमावलीचे पालन करत नसल्याने एकाच कुटुंबातील अनेक व्यक्ती बाधित झाल्याच्या घटना समोर येत आहेत, अशी भयावह परिस्थिती कानावर येत असतानाही प्रशासन मात्र केवळ बैठका आणि वरिष्ठांना आकडेवारी देण्याच्या कामातच धन्यता मानत असल्याचे चित्र आहे. गावागावांतील स्थानिक समित्याही वाईटपणा कोणी घ्यायचा या मानसिकतेत असल्याने कोलमडून पडल्याचे चित्र आहे.
चौकट
खासगी रुग्णालयांकडून शासनाच्या कोविड उपचार सेंटरमधील मार्गदर्शक तत्त्वांना तिलांजली दिली जात असल्याचे चित्र आहे. काही अपवाद वगळता अनेक खासगी रुग्णालये हातात सुरी घेऊन बसल्याच्याच सुरस कथा बाहेर येत असतात. मात्र येथील आमदार, खासदारांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांना याचे काहीही देणे-घेणे उरलेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांना मरण्यासाठी खासगी रुग्णालयातच जाण्याचा पर्याय निवडावा लागत असल्याचे भयावह चित्र आहे. आपण समाजाचे देणे लागतो, ही शुद्ध भावना असणारी दिलदारी प्रशासन, समाज आणि लोकप्रतिनिधींच्या पातळीवर कुठेच दिसत नाही.