वाळवा तालुक्याचा मृत्युदर जिल्ह्यात सर्वाधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:28 AM2021-05-20T04:28:49+5:302021-05-20T04:28:49+5:30
सांगली : जिल्ह्याचा मृत्युदर महाराष्ट्र व देशाच्या मृत्युदरापेक्षा अधिक असून जिल्ह्यात सर्वाधिक मृत्युदर वाळवा तालुक्याचा ३.८८ टक्के इतका आहे. ...
सांगली : जिल्ह्याचा मृत्युदर महाराष्ट्र व देशाच्या मृत्युदरापेक्षा अधिक असून जिल्ह्यात सर्वाधिक मृत्युदर वाळवा तालुक्याचा ३.८८ टक्के इतका आहे. विभागनिहाय विचार केल्यास ग्रामीण व शहरी भागाच्या तुलनेत महापालिका क्षेत्रातील मृत्युदर सर्वाधिक आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी मृत्युदर अधिक आहे, तिथे कडक उपाययोजना करण्याची व अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचा कहर अजूनही कायम आहे. कडक लॉकडाऊन सुरू असतानाही रुग्णसंख्या नियंत्रणात आलेली नाही. दररोज १ हजार २०० च्या घरात रुग्णसंख्या असून, मृत्यूचे आकडे ४० ते ५० च्या घरात कायम आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येपेक्षा मृत्युदराची चिंता अधिक आहे. सध्याची उपलब्ध खाटांची त्यातही ऑक्सिजन व व्हेंटिलेटर्सच्या खाटांची संख्या पाहिली तर ती खूपच कमी आहे. वेळेत उपचार मिळणे, ऑक्सिजन व व्हेंटिलेटरचा बेड मिळणे आता कठीण होत आहे. अनेकांना रुग्णालयातील बेड मिळण्याच्या प्रतीक्षेत थांबून रहावे लागत आहे. ही स्थितीच मृत्युदर वाढण्यास कारणीभूत ठरत आहे.
जत, आटपाडी, खानापूर या दुष्काळी पट्ट्यातील तसेच अन्य तालुक्यांतील लांबच्या गावांत आढळणाऱ्या रुग्णांना तालुकास्तरावर ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळत नसल्याने त्यांना कित्येक किलोमीटरचे अंतर कापत सांगली, मिरजेत यावे लागते. तोपर्यंत उशीर होतो. त्यामुळेही मृत्यूच्या घटना वाढत आहेत. मृत्यूचे प्रमाण का वाढत आहे, याचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना करण्याची अधिक गरज आहे. सध्या अशा उपाययोजना होताना दिसत नाहीत.
चौकट
विभागनिहाय मृत्युदर
ग्रामीण २.७८
शहरी ३.०८
महापालिका क्षेत्र ३.१९
जिल्ह्याचा एकूण २.९३
चौकट
तालुकानिहाय मृत्युदर
आटपाडी १.११
जत २.११
कडेगाव २.८६
क. महांकाळ २.८६
मिरज ३.०७
पलूस ३.५९
तासगाव ३.८४
वाळवा ३.८८
चौकट
काय आहेत कारणे?
वेळेत ऑक्सिजन, व्हेंटिलेटर न मिळणे
रुग्णालयातील बेड लवकर उपलब्ध न होणे
मदत कक्ष व रुग्णालयातील समन्वयाचा अभाव असल्याने रुग्णांचे हेलपाटे
तातडीने निदान न होणे
खासगी रुग्णालयात तपासणी न करताच औषधोपचार घेणे
ग्रामीण स्तरावर वैद्यकीय उपकरणांची कमतरता