Sangli: मिरज विधानसभा लढविण्याची वंचित बहुजन आघाडीची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 04:30 PM2023-12-07T16:30:12+5:302023-12-07T16:30:45+5:30
खाडे यांच्याविरोधात दमदार उमेदवार देण्याचे महाविकास आघाडीपुढे आव्हान
सदानंद औंधे
मिरज : आगामी विधानसभा निवडणुकीत मिरजेची जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच बहुजन वंचित आघाडीने मिरजेची जागा लढविण्याची तयारी सुरू केली आहे. गत लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला तीन लाख मते मिळाली असल्याने सांगली लोकसभा व मिरज विधानसभेसाठी वंचितचा दावा आहे. यामुळे महाविकास आघाडीची अडचण होण्याची शक्यता आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत मिरज राखीव जागेवर भाजपचे मंत्री सुरेश खाडे यांच्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे तुल्यबळ उमेदवाराचा शोध सुरू आहे. मिरजेची जागा ठाकरे गटाला सोडण्यात येणार असल्याचा शिवसेनेचा दावा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मिरजेसाठी इच्छुक उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना देत आहेत. मात्र, महाविकास आघाडीत नसतानाही शिवसेनेसोबत असलेल्या वंचित आघाडीनेही मिरज विधानसभेवर हक्क सांगितल्याने शिवसेनेचीही अडचण होणार आहे.
गत लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी तिसऱ्या क्रमांकाची तीन लाख मते व मिरज विधानसभा मतदारसंघात ३० हजारांवर मते मिळवली होती. यामुळे वंचित आघाडीने सांगली लोकसभेसाठी प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे व मिरज विधानसभेसाठी युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजित घाटे हे उमेदवार निश्चित करून तयारी सुरु केली आहे. गेल्या आठवड्यात डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी मिरजेत येऊन मुस्लिम धर्मगुरूंची भेट घेतली. महिन्यापूर्वी सुजात आंबेडकर जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चात सहभागी झाले होते.
महाविकास आघाडीत संघर्षाची चिन्हे
मिरज राखीव मतदारसंघात दलित व मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने वंचितने मिरजेवर लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे महाविकास आघाडीत मिरजेच्या जागेवरून संघर्षाची शक्यता आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या इच्छुकांना हा पेच सुटण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मिरजेत सुरेश खाडे यांनी दोनवेळा शिवसेनेसोबत व एकदा सेनेशिवाय विजय मिळवून हॅटट्रिक साधली आहे. २०१९ मध्ये खाडे यांच्यासोबत शिवसेना होती, तेव्हा सर्व विरोधी पक्षांतर्फे बाळासाहेब होनमोरे एकच उमेदवार उभे होते. त्यामुळे खाडे यांचे मताधिक्य घटून ३० हजारांवर आले.
खाडेंविरोधात एकच उमेदवार
भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत असताना वंचित आघाडीच्या उमेदवाराने स्वतंत्र निवडणूक लढविल्यास आघाडीची अडचण होणार आहे. वंचितमुळे तिरंगी लढत झाल्यास भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे भाजप विरोधात एकच दमदार उमेदवार देण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.