'वंदे भारत'चा सांगलीला ठेंगा अन् उत्पन्नात कमी असलेल्या साताऱ्याला थांबा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 01:21 PM2023-12-12T13:21:34+5:302023-12-12T13:22:31+5:30

सांगलीतील प्रवाशांतून नाराजी : १७ डिसेंबर रोजी पंतप्रधानांकडून उद्घाटन

Vande Bharat Express from Mumbai to Kolhapur will be inaugurated on December 17 by Prime Minister Narendra Modi | 'वंदे भारत'चा सांगलीला ठेंगा अन् उत्पन्नात कमी असलेल्या साताऱ्याला थांबा

'वंदे भारत'चा सांगलीला ठेंगा अन् उत्पन्नात कमी असलेल्या साताऱ्याला थांबा

सांगली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामार्फत मुंबई ते कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन करण्यात येणार आहे. मात्र, या गाडीला पुण्याखालोखाल सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या सांगली स्थानकात थांबा न देता उत्पन्नात सर्वांत कमी असलेल्या सातारा स्थानकावर थांबा दिला आहे. त्यामुळे सांगलीतील सामाजिक संघटना, प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या मुंबई ते कोल्हापूर मार्गावर सुरू असलेल्या सर्व रेल्वे गाड्यांमध्ये कोल्हापूरपाठोपाठ सांगली रेल्वे स्थानकावरून सर्वाधिक तिकिटांचे बुकिंग होत असते. कराड व किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानक दुसऱ्या क्रमांकावरचे उत्पन्न देत आहे व सातारा हे सर्वांत कमी उत्पन्न देत आहे. तरीही मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगली व किर्लोस्करवाडी या दोन सर्वाधिक उत्तम उत्पन्न देणाऱ्या रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्स्प्रेसला थांबा दिला नाही.

पाच हजार कोटी खर्च करून पुणे-सांगली-लोंढा रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण करण्यात आले. जेणेकरून पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यासह सांगलीसारख्या प्रमुख महानगराला जलद रेल्वे गाड्यांचा संपर्क मिळावा. सांगली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पुणे-लोंढा दुपदरीकरण रेल्वे प्रकल्पासाठी आपल्या जमिनी दिलेल्या आहेत. तरीही याच सांगली जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालय असलेल्या सांगली रेल्वे स्टेशनवरून वंदे भारत सेमी बुलेट ट्रेन सुसाट निघून जाणार आहे.

नेत्यांवर नाराजी

एखाद्या प्रमुख शहराला रेल्वे गाडीचा थांबा मिळला नाही, तर संबंधित शहरातील लोकप्रतिनिधी रेल्वे मंत्रालयाकडे धाव घेतात व त्या गाडीला थांबा मिळवून देतात. मात्र, सांगलीच्या बाबतीत राजकीय उदासीनता दिसून येते, असे मत नागरिक जागृती मंचच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.


सांगली जिल्ह्याचे खासदार व स्थानिक आमदारांनी हा थांबा मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. सर्व नागरिकांनी सांगली व किर्लोस्करवाडी या दोन रेल्वे स्टेशनवर वंदे भारत एक्स्प्रेसचा थांबा मिळवून देण्यासाठी रेल्वे प्रशासनाबरोबर संघर्षाची तयारी ठेवावी. लोकप्रतिनिधींनी जर याप्रश्नी लक्ष दिले नाही, तर सांगलीकर म्हणून आम्ही येत्या लोकसभा निवडणुकीत याचा हिशेब करू. - सतीश साखळकर, नागरिक जागृती मंच.

Web Title: Vande Bharat Express from Mumbai to Kolhapur will be inaugurated on December 17 by Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.