वांगी, वडियेरायबागचे दोन तलाठी निलंबित
By admin | Published: December 9, 2014 10:59 PM2014-12-09T22:59:41+5:302014-12-09T23:16:57+5:30
महसूल विभागात खळबळ : वाळू तस्करांवर कारवाई करण्यात कुचराई
वांगी : कडेगाव तालुक्यातील वांगी व वडियेरायबाग येथील येरळा नदीपात्रातील अवैध वाळू उपसा प्रकरणीच्या कारवाईत कुचराई केल्याने वांगी येथील गावकामगार तलाठी एस. एस. शिरतोडे व वडियेरायबाग येथील गावकामगार तलाठी एस. व्ही. खोत यांना कडेगावचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी निलंबित केले आहे. आज, सोमवारी दुपारी प्रांताधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्याने महसूल विभागात खळबळ उडाली असून वाळू तस्करही कारवाईच्या भीतीने चांगलेच धास्तावले आहेत.
कडेगाव तालुक्यातील वांगी व वडियेरायबाग या परिसरात येरळा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाळूसाठा होता. मात्र या परिसरातील वाळू तस्कर मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी करीत आहेत. याबाबत मागील वर्षापासून प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी तलाठी एस. एस. शिरतोडे व एस. व्ही. खोत यांना अवैध वाळू उपसा रोखणे व वाळू तस्करांवर कारवाई करण्याचे, तसेच वाळू उपसा झालेल्या जागेचे पंचनामे करून त्याबाबत कारवाई करण्याच्या वारंवार सूचना दिल्या होत्या. मात्र या दोन्ही तलाठ्यांनी प्रांताधिकारी यांच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे व वाळू तस्करांवर कारवाई करण्यात कुचराई केल्याने येरळा पात्रातून वाळू तस्कर मोठ्या प्रमाणात राजरोसपणे वाळूची चोरी करीत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी व ग्रामपंचायत प्रशासनाने प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. त्यामुळे वांगी व वडियेरायबाग येथील तलाठ्यांवर उपशाबाबतच्या कारवाईत कुचराई केल्याप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली. या कारवाईने येरळा नदीकाठावरील तलाठी व मंडल अधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)
कडेगाव तालुक्यात यापूर्वी वाळू तस्करांवर वाळू चोरीप्रकरणी किरकोळ दंडात्मक कारवाई होत होती. मात्र, दंडात्मक कारवाईनंतरही तस्कर राजरोसपणे वाळूचोरी करीत होते. महसूल खात्यातील कर्मचारी वाळू तस्करांना पाठीशी घालत असल्याचा ठपका ठेवत प्रांताधिकारी कांबळे यांनी तलाठ्यांवर कडक कारवाई केल्यामुळे आपणालाही मोठ्या कारवाईस सामोरे जावे लागणार, या भीतीमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.