वारणाली रुग्णालय निविदेविरुद्ध दावा फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:19 AM2021-06-22T04:19:05+5:302021-06-22T04:19:05+5:30
सांगली : वारणाली येथील महापालिकेच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या बांधकामाची दरनिश्चिती व कार्यारंभ आदेशाबाबत जिल्हा न्यायालयात दाखल दावा फेटाळण्यात आला. सामाजिक ...
सांगली : वारणाली येथील महापालिकेच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या बांधकामाची दरनिश्चिती व कार्यारंभ आदेशाबाबत जिल्हा न्यायालयात दाखल दावा फेटाळण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते हणमंत सरगर यांनी आयुक्तांना दरनिश्चितीचे अधिकार नाहीत, अशी याचिका दाखल केली होती. या रुग्णालयाबाबत सर्वच न्यायप्रविष्ट बाबी संपुष्टात आल्याने महापालिकेने बांधकामाला सुरुवात केली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातून महापालिकेला पाच कोटी रुपयांचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय मंजूर झाले. हे रुग्णालय कुपवाडमध्ये बांधण्याचा निर्णय झाला. वारणाली की वाघमोडेनगर असा जागेचा वाद रंगला. तब्बल सात वर्षे हा वाद सुरू आहे. तत्कालीन आयुक्तांनी रुग्णालयाबाबत बोटचेपी भूमिका घेतल्याने निर्णय झाला नाही. विद्यमान आयुक्त नितीन कापडणीस यांनी मात्र रुग्णालयाचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. वारणाली येथील जागेतच रुग्णालय बांधण्यास शासनानेही मान्यता दिली. त्यानंतर जागेच्या मूळ मालकासह काहीजणांनी न्यायालयात दावे दाखल केले. काही दिवसांपूर्वी मूळ मालकाचा दावा फेटाळला होता.
सामाजिक कार्यकर्ते हणमंत सरगर व इतरांनी निविदेची दरनिश्चिती व कार्यारंभ आदेश देण्याचा अधिकार आयुक्तांना नाही, असा मुद्दा उपस्थित करीत न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयात सुनावणी झाली. महापालिकेतर्फे मुख्य कायदा सल्लागार अॅड. एस. एस. मेहता यांनी युक्तिवाद केला. महापालिका अधिनियमातील ४५० ‘अ’ मध्ये दुरुस्ती झाली असून राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानअंतर्गत प्रशासकीय मान्यतेचे अधिकार आयुक्तांना देण्यात आले आहेत. शासनाने तसे आदेशही काढले आहेत. त्यामुळे आयुक्तांनी राबविलेली प्रक्रिया योग्य आहे. या सर्व बाबी न्यायालयात मांडण्यात आल्या, असे अॅड. मेहता यांनी सांगितले. न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरत सरगर यांचा दावा फेटाळला. रुग्णालय बांधकामातील सर्वच अडचणी आता दूर झाल्याने महापालिकेने बांधकामाला सुरुवात केली आहे.