शिराळ्यात वारणा पात्राबाहेर

By admin | Published: July 19, 2014 11:11 PM2014-07-19T23:11:34+5:302014-07-19T23:23:44+5:30

जोर कायम : शिराळेखुर्द-माणगाव बंधारा पाण्याखाली

Varna out of vein in winter | शिराळ्यात वारणा पात्राबाहेर

शिराळ्यात वारणा पात्राबाहेर

Next

चरण/पुनवत : शिराळा पश्चिम भागात पावसाचा जोर कायम राहिल्याने वारणा नदीचे पाणी पात्राबरोबर तुडुंब भरून वहात आहे. काहीठिकाणी पाणी पात्राबाहेर पडले आहे. आज (शनिवारी) सकाळी पावसाचा जोर होता; मात्र नंतर दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती.
पावसाचा जोर कायम राहिल्याने खुंदलापूर, मणदूर परिसरात भात लावणीच्या कामाला वेग आला आहे, तर चरण, आरळा परिसरात शेतकरी भात पिकाच्या दुबार भांगलणी करणे, चिखल, कोळपा करण्यात व्यस्त आहेत. दोन दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास वारणा नदी पात्राबाहेर येण्याची शक्यता आहे. चार दिवसानंतर शिराळा पश्चिम भागात सूर्याचे दर्शन घडले आहे.
शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून, वारणेच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. चांदोली धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे आज (शनिवारी) दुपारी अनेक ठिकाणी वारणेचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. शिराळेखुर्द ते माणगाव दरम्यानचा बंधारा पाण्याखाली गेल्याने मार्ग बंद आहे.
तालुक्यात सकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. पश्चिम भागातील कोकरुडपासून चांदोलीपर्यंत पावसाचा जोर जास्त आहे. चांदोली धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या सुरू असलेला पाऊस भात शेतीला पूरक असल्याने तालुक्यातील शेतकरीवर्ग चांगलाच सुखावला आहे. मात्र पावसाचा जोर आणखी वाढला तर नदीकाठच्या पिकांना धोका निर्माण होणार आहे. दरम्यान, तालुक्यात सर्वच तलावांतील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. (वार्ताहर)

Web Title: Varna out of vein in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.