सांगलीत अनोखे आंदोलन, रेल्वे पुलाचे काम रेंगाळले म्हणून घातले वर्षश्राद्ध
By अविनाश कोळी | Published: June 10, 2024 07:10 PM2024-06-10T19:10:45+5:302024-06-10T19:11:13+5:30
एका गटाने घातली श्राद्धपूजा; दुसऱ्या गटाने घातले जेवण!
बुधगाव : सांगलीत चिंतामणीनगर येथील रेल्वेमार्गावरील जुना उड्डाणपूल पाडल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. नवीन पुलाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. यामुळे वर्षभरापासून सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. याप्रश्नी ढिम्म प्रशासनाच्या कारभाराविरोधात सोमवारी वर्षश्राद्धाचे अनोखे आंदोलन पार पडले. एका गटाने भटजी आणून श्राद्धपूजेचे सोपस्कार पार पाडले, तर दुसऱ्या गटाने चक्क श्राद्धाचे जेवणच घातले.
दक्षिण-मध्य रेल्वेच्या मिरज ते पुणे या लोहमार्गाच्या दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे बहुतांश काम पूर्ण होत आले आहे. या अंतर्गतच सांगलीत चिंतामणीनगर येथील नवीन उड्डाणपुलाचे काम मागील वर्षी सुरू केले आहे. सांगली ते विटा फलटण असा राज्यमार्ग इथून जातो. नवीन पुलाचे काम सुरू करण्यासाठी १० जून २०२३ रोजी जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करून पाडण्यात आला. त्यामुळे सांगलीतून तासगाव, विट्याकडे जाण्यासाठी किंवा येण्यासाठी सांगलीत जुना बुधगाव रस्ता आणि संजयनगरमार्गे किंवा माधवनगर जकात नाक्यातून कर्नाळ रोड म्हसोबा मार्गे असे पर्यायी मार्ग प्रशासनाने त्यावेळी सुचविले. त्यावेळी मात्र या पर्यायी मार्गांची अवस्था दयनीय होती. उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यापूर्वीच या पर्यायी मार्गांच्या रुंदीकरण, डांबरीकरणाची कामे करणे गरजेचे होते. मात्र, ते झाले नाही.
पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू करूनच रुंदीकरण, डांबरीकरणाची कामे करण्यात आली. काही ठिकाणी आजही ती सुरूच आहेत. यामुळे आधीच वैतागलेल्या वाहनधारक, सामान्यांना प्रशासनाच्या कारभाराचा त्रास आजही सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्या ढिम्म कारभाराविरोधात सोमवारी सकाळी माधवनगर व्यापारी असोसिएशनच्या पुढाकाराने माधवनगर, बुधगाव, कवलापूर, बिसूर व परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत जुन्या पुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ वर्षश्राद्धाचा विधी पार पाडण्यात आला.
यावेळी माधवनगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप बोथरा, माजी आमदार नितीन शिंदे, नीताताई केळकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती विक्रम पाटील, योगेश देसाई, माधवनगरच्या सरपंच अंजू तोरो, शेखर तोरो, उदय पाटील, मनजित पाटील, राजू आवटी, नीलेश हिंगमिरे, अण्णा मोने, बुधगावच्या सरपंच वैशाली पाटील, मनोहर पाटील, जयश्री पाटील, संगीता पाटील उपस्थित होते.
नागरिक कृती समितीचेही वर्षश्राद्ध आंदोलन झाले. यावेळी जुन्या पुलाच्या प्रतिमेस पुष्पहार घालून, फुले टाकून, आदरांजली वाहण्यात आली. यावेळी नागरिक कृती समितीचे अध्यक्ष सतीश साखळकर, माजी आमदार नितीन शिंदे, डाॅ. संजय पाटील, प्रा. नंदू चव्हाण, माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, बाळासाहेब कलशेट्टी, पृथ्वीराजनाना पाटील, गिरीश शिंगणापूरकर, आदी उपस्थित होते.