शिवाजी विद्यापीठ नामविस्तारास सांगली जिल्'ातून विरोध : बदल नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 08:29 PM2019-12-09T20:29:50+5:302019-12-09T20:32:32+5:30
सांगली : कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराची मागणी छत्रपती संभाजीराजेंनी केल्यानंतर या विषयावरून विविध मतप्रवाह समोर येत आहेत. सांगली जिल्'ातील ...
सांगली : कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराची मागणी छत्रपती संभाजीराजेंनी केल्यानंतर या विषयावरून विविध मतप्रवाह समोर येत आहेत. सांगली जिल्'ातील विचारवंत, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, समाजसेवी संस्थांचे पदाधिकारी यांनी नामविस्ताराच्या मागणीस तीव्र विरोध दर्शविला. बिरुदावलीपेक्षा नाव जपणे महत्त्वाचे आहे. बिरुदावली लावण्याच्या प्रयत्नात अन्य महापुरुषांच्या नावे असलेल्या संस्थांची जी संक्षिप्त नावे झाली त्यासारखी स्थिती आपल्या विद्यापीठाची होऊ नये, असे मत मान्यवरांनी मांडले.
शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेवेळीच या विषयावरून बरेच मंथन झाले होते. बिरुदावलीपेक्षा शिवाजी हे नाव महत्त्वाचे आहे. ते लोकांमध्ये जपले पाहिजे. बिरुदावलीच्या रूपाने संक्षिप्त रूप तयार होऊन शिवाजी महाराजांचे नाव पुसले जाण्याची दाट शक्यता आहे. सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस यांच्या मोठ्या नावामुळे संक्षिप्त रूप येऊन मूळ नाव पुसले गेले. शिवाजी विद्यापीठाचे संक्षिप्त रूप होऊ शकत नाही. त्यामुळे हेच नाव ठेवावे. हा मुद्दा भावनिक करू नये.
- के. डी. शिंदे, जिल्हाध्यक्ष, जनता दल
विद्यापीठातील बैठकीत यापूर्वीही नामविस्ताराचा विषय चर्चेत आला होता. त्यावेळी आम्ही त्यास पूर्णत: विरोध दर्शविला होता. नामविस्तारामुळे संक्षिप्त नाव येऊन शिवाजी महाराजांचे नाव पुसले जाण्याची शक्यता आहे. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे संक्षिप्त रूप वापरले जाते. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्याबाबतीत असा प्रकार होऊ नये, असे आमचे मत आहे.
- मेघा गुळवणी, सदस्या, विद्वत सभा, शिवाजी विद्यापीठ
नामविस्ताराचा नवीन घोळ घालू नये. शिवाजी विद्यापीठाचे नाव निश्चित करताना या सर्व चर्चा त्यावेळी झाल्या होत्या. विवेकानंद महाविद्यालय, यशवंतराव विद्यालय अशा अनेक संस्था केवळ नावाने उभारल्या आहेत. बिरुदावली न लावताही त्यांच्याविषयीचा आदरभाव कायम राखला गेला. बिरुदावल्या महत्त्वाच्या की माणूस महत्त्वाचा, याचा विचार केला पाहिजे. अकारण शब्दांचा खेळ करू नये, अशी माझी नामविस्ताराची मागणी करणाऱ्या सर्वांना विनंती आहे.
- प्रा. डॉ. बाबूराव गुरव, ज्येष्ठ विचारवंत
महापुरुषांच्या नावे त्यांच्या बिरुदावलीसह ज्या संस्था, विद्यापीठे आहेत, त्यांच्या संकेतस्थळांची पाहणी केली तर, त्यातून महापुरुषांची नावे गायब झाली आहेत. केवळ शिवाजी विद्यापीठाच्या संकेतस्थळात किंवा कोणत्याही कागदपत्रात असे संक्षिप्त रूप आले नाही. त्यामुळे नामविस्तारामुळे शिवाजी महाराजांचे नाव पुसले जाण्याचा धोका आहे. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती शिवाजी टर्मिनस यांचे संक्षिप्त रूप वापरात येत आहे. ते थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत. शिवाजी विद्यापीठाच्या बाबतीत ही चूक केली जाऊ नये.
- डॉ. संजय पाटील, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा
शिवाजी विद्यापीठ हे नाव निश्चित करताना बराच विचारविमर्श झालेला आहे. अत्यंत विचारपूर्वक व प्रामाणिकपणे चांगला निर्णय झाला आहे. राज्यातील, देशातील अनेक महापुरुषांच्या नावांच्या संस्थांचा अभ्यास केला तर, त्याठिकाणी संक्षिप्त रूप वापरले जात आहे. एकमेव शिवाजी विद्यापीठ हे महाराजांच्या नावाचे अस्तित्व राखून आहे. यात कोणताही एकेरीपणा किंवा अनादर नाही. आदरपूर्वकच आपण नावाचा उल्लेख करीत असतो. त्यामुळे मला वाटते की हे नाव बदलू नये.
- डॉ. माणिकराव साळुंखे, माजी कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ