वसंतदादा बॅँक बाडबिस्तारा गुंडाळणार : सांगलीतील मुख्यालय विकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 11:21 PM2019-12-31T23:21:10+5:302019-12-31T23:21:43+5:30
सांगली-मिरज रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी असलेली बॅँकेच्या मुख्यालयाची सुंदर वास्तू बॅँकेच्या हातून गेली आहे. वसंतदादांच्या नावची ही संस्था अवसायनातही किमान नावासहीत उभी होती. आता बॅँकेच्या इमारतीवरील नावही संपुष्टात येईल. बॅँकेच्या अधोगतीचा हा प्रवास अनेकांना वेदनादायी ठरणारा आहे.
अविनाश कोळी ।
सांगली : मुख्यालयाची इमारत लिलावात विकली गेल्याने अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या कार्यालयासाठी आता जागेचा शोध सुरू झाला आहे. येथील बाडबिस्तारा गुंडाळून बॅँक येत्या महिन्याभरात पर्यायी जागेत कार्यालयाचे स्थलांतर करण्याची तयारी सुरू झाली आहे.
वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीचा १० कोटी ७२ लाखांला लिलाव काढला होता. डेक्कन इन्फ्रा या सांगलीच्या निविदाधारकास ही इमारत विक्री करण्यात आली आहे. जिल्हा बॅँकेने एकूण सहा इमारतींची लिलाव प्रक्रिया राबविली होती. त्यातील चार इमारतींच्या लिलाव प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांची विक्री प्रक्रिया रेंगाळली आहे. मुख्यालयाच्या इमारतीसाठी मोठा प्रतिसाद लाभला आणि या इमारतीची विक्री झाली आहे. बॅँकेचे अवसायनोत्तर कामकाज मुख्यालयातूनच चालत होते.
याठिकाणी अवसायक, व्यवस्थापक व कर्मचारी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून कामकाज चालू ठेवले आहे. अद्याप कर्जवसुली आणि ठेवीदारांच्या रकमा देण्याची मोठी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. अशा परिस्थितीत मुख्यालयच विकले गेल्याने बॅँकेला येथील बाडबिस्तारा गुंडाळावा लागेल. बॅँकेला आता कामकाजासाठी अन्यत्र कार्यालय स्थलांतरित करावे लागत आहे. त्यासाठी बॅँकेच्या विक्रीस न गेलेल्या अन्य शाखा किंवा मध्यवर्ती ठिकाणी एखादी पर्यायी जागा शोधण्याची वेळ अवसायकांवर आली आहे. त्याची लगबग बॅँकेकडून सुरू झाली आहे.
सांगली-मिरज रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी असलेली बॅँकेच्या मुख्यालयाची सुंदर वास्तू बॅँकेच्या हातून गेली आहे. वसंतदादांच्या नावची ही संस्था अवसायनातही किमान नावासहीत उभी होती. आता बॅँकेच्या इमारतीवरील नावही संपुष्टात येईल. बॅँकेच्या अधोगतीचा हा प्रवास अनेकांना वेदनादायी ठरणारा आहे. जिल्ह्याच्या विशेषत: शहराच्या अर्थकारणात कधीकाळी या बॅँकेने योगदान दिले होते. तत्कालीन संचालकांनी नियबाह्य कर्जवाटप, गैरकारभारातून या बॅँकेला हादरे दिले आणि ही बॅँक रसातळाला पोहोचली. बॅँकेच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्नसुद्धा झाले नाहीत.
कागदपत्रांनी भरली कपाटे
चौकशी अधिकारी तसेच अवसायकांकडील कागदपत्रांनी येथील कपाटे भरली आहेत. अन्यत्र ही कागदपत्रे स्थलांतरित करताना मोठ्या जागेची व्यवस्था करावी लागणार आहे. चौकशी अधिकाऱ्यांकडेही मोठ्या प्रमाणावर बॅँकेची कागदपत्रे आहेत. त्याशिवाय अवसायकांकडे बॅँकेच्या आजवरच्या सर्व कागदपत्रांसह, न्यायालयीन प्रकरणे, कर्जदारांच्या मालमत्तांचा तपशील, पत्रव्यवहार, सभा, अहवाल व ठरावांच्या प्रती अशा वेगवेगळ््या प्रकारची लाखो कागदपत्रे येथे आहेत.
ताबा प्रक्रियेसाठी महिन्याचा काळ
लिलाव प्रक्रियेनंतर मुख्यालयाचा ताबा संबंधित खरेदीदारास देण्यासाठी आवश्यक कागदोपत्री प्रक्रिया पार पाडावी लागते. किमान महिनाभर याला अवधी जाण्याची शक्यता आहे. तरीही कार्यालय तसेच येथील कागदपत्रे स्थलांतरित करण्यासाठी बॅँकेकडे कमी कालावधी उरला असल्याने त्यांनी आतापासून पर्यायी जागेची चाचपणी सुरू केली आहे.
चौकशी अधिकाऱ्यांचीही अडचण : बॅँकेच्या २४७ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशी आर. डी. रैनाक करीत आहेत. सध्या चौकशीचे कामकाज ठप्प असले तरी, ती पुन्हा सुरू होण्याची चिन्हे आहेत. चौकशी अधिकाºयांना मुख्यालयातच जागा दिली आहे. आता त्यांच्यासाठीही पर्यायी जागेचा शोध घ्यावा लागणार आहे.