वसंतदादा बँक विलिनीकरणास जिल्हा बँकेची नापसंती, तूर्त प्रस्ताव बारगळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 07:03 PM2017-12-13T19:03:02+5:302017-12-13T19:12:52+5:30
अवसायनातील वसंतदादा शेतकरी बँक सांगली जिल्हा बँकेत विलीन करण्याच्या गतिमान झालेल्या हालचाली आता थडावल्या आहेत. तूर्त इतका मोठा तोटा पोटात घालून वसंतदादा बॅँक घेण्यास जिल्हा बॅँक प्रशासन अनुकूल नाही. तूर्त विलिनीकरणाचा प्रस्ताव बारगळला आहे. बॅँकेच्या प्रधान कार्यालयासह १५ शाखांच्या इमारतींची किंमत सुमारे ६० कोटींच्या घरात आहे.
सांगली : अवसायनातील वसंतदादा शेतकरी बँक सांगली जिल्हा बँकेत विलीन करण्याच्या गतिमान झालेल्या हालचाली आता थडावल्या आहेत. तूर्त इतका मोठा तोटा पोटात घालून वसंतदादा बॅँक घेण्यास जिल्हा बॅँक प्रशासन अनुकूल नाही. तूर्त विलिनीकरणाचा प्रस्ताव बारगळला आहे.
सर्वाधिक लाभांश देणारी बॅँक म्हणून सहकार क्षेत्रात वसंतदादा बॅँकेचा एकेकाळी दबदबा होता. मात्र नियमबाह्य कर्जवाटप, संचालकांचा मनमानी कारभार, इमारतींवर केलेला अवाढव्य खर्च, राजकारण्यांना दिलेली बेकायदेशीर कर्जे यामुळे बॅँकेचा तोटा वाढत गेला आणि बॅँक बंद पडली. बॅँकेच्या सांगलीसह राज्यात ३६ शाखा होत्या.
बँक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्यानंतर ठेवीदारांच्या ठेवी मिळणे मुश्किल झाले. याबाबतच्या तक्रारीनंतर रिझर्व्ह बँकेने तत्कालीन सहकार आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले. त्यांच्या अहवालानंतर २६ जून २००८ रोजी रिझर्व्ह बॅँकेने बँकेवर आर्थिक निर्बंध घातले. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत ७ जानेवारी २००९ रोजी या बँकेचा बॅँकिंग परवाना रिझर्व्ह बॅँकेने रद्द केला व १६ फेब्रुवारीरोजी बॅँकेवर अवसायक मंडळ आले.
जिल्हा बॅँकेत ४६ लाखांचे शेअर्स वसंतदादा बॅँकेचे आहेत. ते परत मिळावेत, यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. बॅँकेचे अवसायक शीतल चोथे यांनी अनौपचारिकरित्या वसंतदादा बॅँक जिल्हा बँकेत विलीन करून घेण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला.
जिल्हा बॅँकेच्या पॅनेलवरील सीए व अर्थतज्ज्ञांकडून वसंतदादा बॅँकेची मालमत्ता, येणी, देणी, कायदेशीर बाबी आदींची तपासणी करून अहवाल देणार आहे. हा अहवाल संचालक मंडळात मांडून तेथे निर्णय होईल. त्यानंतर रिझर्व्ह बँक व राज्य शासनाच्या मंजुरीने विलिनीकरणाबाबत निर्णय होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले होते.
प्रत्यक्षात गेल्या काही महिन्यात झालेल्या आर्थिक अहवालाचा विचार करता ही बॅँक तूर्त जिल्हा बॅँकेत विलीन करणे जोखमीचे ठरणार असल्याचे दिसत आहे. तसाच सूर प्रमुख अधिकाऱ्यांमधूनही उमटत असल्याचे समजते. त्यातच जिल्हा बॅँकेच्या नफ्याला गत आर्थिक वर्षात विविध शासकीय धोरणांनी फटका बसला होता. त्यामुळे बॅँकेच्या नफावृद्धीवर सध्या पदाधिकारी व प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण झाल्याशिवाय वसंतदादा बॅँकेचा निर्णय न घेण्याचेही निश्चित झाल्याचे सांगण्यात आले.
वास्तविक चालू आर्थिक वर्षात नोकरभरतीच्या माध्यमातूनही बॅँकेच्या आस्थापनाचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे वाढत्या खर्चात वसंतदादा बॅँकेची जबाबदारी घेणे व्यावहारिकदृष्ट्या चुकीचे ठरेल, असेही मत पुढे येत आहे. त्यामुळे हा प्रस्ताव बारगळणार आहे.
अशी आहे वसंतदादा बँकेची आर्थिक स्थिती...
वसंतदादा बॅँकेच्या ठेवीदारांची १६० कोटींची ठेव विमा महामंडळाच्या माध्यमातून परत करण्यात आली. कर्जदारांकडील सुमारे ८० कोटी रुपये वसूल करून विमा महामंडळाला परत करण्यात आले आहेत. बॅँकेच्या भाड्याच्या इमारतीतील शाखा बंद करण्यात आल्या. स्वमालकीच्या १७ इमारतींमधील शाखाही बंद करण्यात आल्या असून, यातील गोरेगाव (मुंबई) व सांगलीतील गावभाग शाखेची इमारत विकण्यात आली आहे.
सध्या प्रधान कार्यालयासह १५ शाखा ठेवण्यात आल्या आहेत. या शाखाही कागदोपत्री आहेत. सर्व कारभार प्रधान कार्यालयातूनच चालतो. मार्च १७ अखेर १५८ कोटींच्या ठेवी द्यायच्या आहेत, तर १६९ कोटींची थकीत कर्जाची येणेबाकी आहेत. बॅँकेच्या प्रधान कार्यालयासह १५ शाखांच्या इमारतींची किंमत सुमारे ६० कोटींच्या घरात आहे.