Sangli News: वसंतदादा बँकेने नियमबाह्य दिलेले तीन कोटींचे कर्ज वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 07:12 PM2023-03-10T19:12:14+5:302023-03-10T19:12:35+5:30
महापालिकेच्या ठेवी परत मिळविण्याबाबतही प्रयत्न
मिरज : वसंतदादा शेतकरी बँकेने कर्नाटकात नियमबाह्य दिलेल्या तीन कोटी कर्जासह वर्षभरात २० कोटी थकित कर्ज वसूल केले आहे. बॅंकेच्या अवसायकाची मुदत संपल्याने येत्या वर्षभरात राज्यातील इतर शहरांतील बॅंकेची ३७ कोटींची मालमत्ता विक्री करून ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यात येणार असल्याचे बॅंकेच्या अवसायक व महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले.
अवसायक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या वर्षभरात २० कोटी रुपये वसूल केले आहेत. अवसायकाची १५ वर्षांची मुदत यावर्षी संपल्याने आता आणखी एक वर्ष मुदतवाढीचा प्रस्ताव आहे. पुढील वर्षी मार्चमध्ये बॅंकेवर अवसायनी नियुक्त होणार असल्याने वर्षभरात बँकेच्या मुंबई, पुणे, ठाणे यासह अन्य शहरांतील एकूण ३७ कोटींची मालमत्ता विक्री व तारणी कर्जाच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. बँकेच्या सांगलीतील मुख्य इमारतीचा लिलाव झाला आहे. बॅंकेचे थकित कर्ज येणे १५६ कोटी रुपये असून यापैकी तारणी कर्ज ३५ कोटी आहे.
व्याजासह देणी १५३ कोटी रुपये आहेत. थकित कर्जे वसुलीसाठी सहकार कायद्यान्वये दहा मोठ्या कर्जदारांच्या २० कोटी रुपये वसुलीसाठी जप्ती व लिलावाची कारवाई करण्यात येत असल्याचेही स्मृती पाटील यांनी सांगितले. बँकेने कर्नाटकातील अथणी शुगर्ससह पाच जणांना राज्याबाहेर नियमबाह्य दिलेल्या तीन कोटी १५ लाख थकित कर्जाची वसुली करण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले.
ऐपत असूनही कर्ज भरत नाहीत, अशा अनेक कर्जदारांची प्रकरणे वसुलीचा हुकूमनाम्यासाठी सहकार न्यायालयात प्रलंबित असल्याचेही स्मृती पाटील यांनी सांगितले. यापूर्वी लातूर येथे कार्यरत असताना अनेक बँकांवर प्रशासक व अवसायक म्हणून कामकाज केल्याने या बँकेवर काम करणे सोपे झाले, असे पाटील यांनी सांगितले.
महापालिकेच्या ठेवी परत मिळविण्याबाबतही प्रयत्न
महापालिकेच्या ३२ कोटींच्या ठेवी शेतकरी बॅंकेत अडकल्या आहेत. बॅंकेची थकित कर्जे वसूल झाल्यानंतर सहकार आयुक्त महापालिकेच्या ठेवी परत देण्याबाबत निर्णय घेणार असल्याचेही स्मृती पाटील यांनी सांगितले.