वसंतदादा बँकेतील घोटाळ्याची लवकरच वसुली होणार; सहकार विभागाच्या सूचना

By अविनाश कोळी | Published: May 31, 2023 08:01 PM2023-05-31T20:01:43+5:302023-05-31T20:02:03+5:30

काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांना यासाठी नोटीस काढण्याची तयारी सुरू आहे.

Vasantdada Bank Scam Will Be Recovered Soon Instructions of Cooperative Department | वसंतदादा बँकेतील घोटाळ्याची लवकरच वसुली होणार; सहकार विभागाच्या सूचना

वसंतदादा बँकेतील घोटाळ्याची लवकरच वसुली होणार; सहकार विभागाच्या सूचना

googlenewsNext

सांगली : अवसायनातील वसंतदादा शेतकरी बँकेच्या २४७ कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी दोन महिन्यांपूर्वी चौकशी अधिकाऱ्यांनी अहवाल सादर केला होता. यासंदर्भात सहकार विभागाने हिरवा कंदील दर्शविल्याने वसुलीच्या दृष्टीने पावले टाकली जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांना यासाठी नोटीस काढण्याची तयारी सुरू आहे.

बँकेचे चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांच्यामार्फत या घोटाळ्याची चौकशी करण्यात आली. २७ माजी संचालक व दोन अधिकाऱ्यांच्या १०१ मालमत्तांवर बोजा चढविण्याबाबतचे आदेश यापूर्वी दिले होते. पुणे येथील न्यायाधिकरणाने ते आदेश अंशत: रद्द केले होते. त्यानंतर चौकशी अधिकाऱ्यांनी उर्वरित कामकाज पूर्ण करून दोन महिन्यांपूर्वी त्यांचा अहवाल सहकार विभागाला सादर केला. यामध्ये त्यांनी संबंधित माजी संचालक व अधिकाऱ्यांवर घोटाळ्यातील रकमांची जबाबदारी निश्चित केली आहे. त्यानुसार वसुलीची शिफारसही करण्यात आली आहे. चौकशी अधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार राज्याच्या सहकार विभागाने वसुलीस हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे अवसायकांकडून पावले उचलली जात आहे. रकमांची जबाबदारी निश्चित केलेल्यांना नोटीस काढण्याची तयारी केली जात आहे.

बॅँकेच्या २४७ कोटींच्या घोटाळा प्रकरणाची चौकशी मे २०२२ पासून पुन्हा गतीने सुरू झाली. त्याचा अहवाल दोन महिन्यांपूर्वी सादर करण्यात आला आहे. घोटाळ्याच्या आरोपपत्रात २७ माजी संचालक, तीन मृत माजी संचालकांचे ११ वारसदार आणि दोन अधिकारी अशा ४० जणांवर आरोपपत्र दाखल आहे. यात काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप नेत्यांचा समावेश आहे. 

संचालकांना अपील करण्याची संधी

ज्यांच्याकडून घोटाळ्याच्या रकमेची वसुली केली जाणार आहे, अशा माजी संचालक, अधिकाऱ्यांना अपील करण्याची संधी आहे. अद्याप यासंदर्भात कोणीही अपील सादर केलेले नाही. त्यामुळे सहकार विभागाकडून वसुलीबाबत काय पावले उचलली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित रकमांच्या वसुलीबाबत प्रक्रिया सुरू आहे. अद्याप कोणी अपील दाखल केलेले नाही. त्यामुळे जबाबदारी निश्चित केलेल्या संबंधित लोकांकडून रकमांची वसुली करण्यासाठी कायद्यातील तरतुदीप्रमाणे कार्यवाही केली जाईल. - स्मृती पाटील, अवसायक, वसंतदादा शेतकरी बँक

Web Title: Vasantdada Bank Scam Will Be Recovered Soon Instructions of Cooperative Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली