‘वसंतदादा’ची निवडणूक बिनविरोध?

By admin | Published: April 29, 2016 11:19 PM2016-04-29T23:19:04+5:302016-04-30T00:51:24+5:30

सत्ताधाऱ्यांकडून चर्चा सुरू : ‘स्वाभिमानी’ला एक जागा मिळणार

'Vasantdada' election uncontested? | ‘वसंतदादा’ची निवडणूक बिनविरोध?

‘वसंतदादा’ची निवडणूक बिनविरोध?

Next

सांगली : येथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शेतकरी संघटनेचे सर्वच अर्ज बाद झाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी संघटनेच्या प्रदीप पाटील गटाबरोबर सत्ताधाऱ्यांनी चर्चा सुरू केली आहे. दोन्ही गटाला प्रत्येकी एक जागा देऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठीही हालचाली सुरू आहेत. असे असले तरी, दि. १२ मे रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे त्याचदिवशी बिनविरोधचा अंतिम फैसला होण्याची शक्यता आहे.
वसंतदादा कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत १८२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत यातील ९0 उमेदवारी अर्ज बाद झाले. छाननी प्रक्रिया संपली, तेव्हा ७७ उमेदवारांचे ९२ अर्ज शिल्लक राहिल्याचे चित्र आहे.
सत्ताधारी गटासह शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अन्य बहुतांश इच्छुकांचे अर्ज बाद झाले. आरक्षित जागांवरील उमेदवारांना सलग तीन वर्षे ऊस पुरवठ्याचा नियम लागू नसल्याने त्यांचे अर्ज अवैध ठरले. उत्पादक गटातच सर्वाधिक उमेदवारी अर्ज बाद झाले. त्यामुळे वसंतदादा कारखान्याच्या निवडणुकीचे चित्रच बदलून गेले आहे. या निवडणुकीत आता कोणाचेही पॅनेल होऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. यामध्येही शेतकरी संघटनेतील फुटीर गट असलेल्या प्रदीप पाटील समर्थक सहा उमेदवारांचे अर्ज राहिले आहेत. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आरक्षित जागेवर संभाजी मेंढे यांचा एकमेव अर्ज राहिला आहे. रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेचे सर्वच अर्ज बाद ठरल्यामुळे वसंतदादा कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकच राहिलेला नाही, असे चित्र आहे. सत्ताधाऱ्यांना निवडणूक बिनविरोध करणे सध्या खूपच सोपे झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संभाजी मेंढे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रदीप पाटील गटाला एखादी जागा देण्याबाबत चर्चा आहे. परंतु, काहींनी त्यांना जागा देण्याबाबत विरोध केला आहे. निवडणूक बिनविरोधसाठी पाटील यांच्याशी सत्ताधाऱ्यांना चर्चा करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Vasantdada' election uncontested?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.