वसंतदादा कारखाना, वॉलमार्टला सील

By admin | Published: March 24, 2017 12:24 AM2017-03-24T00:24:03+5:302017-03-24T00:24:03+5:30

महापालिकेची कारवाई : घरपट्टीच्या बड्या थकबाकीदारांवर आयुक्तांचा बडगा

Vasantdada factory, Wal-Marta seal | वसंतदादा कारखाना, वॉलमार्टला सील

वसंतदादा कारखाना, वॉलमार्टला सील

Next



सांगली : महापालिकेने गुरुवारी घरपट्टीच्या बड्या थकबाकीदारांविरोधात वसुलीची मोहीम उघडली. दिवसभरात वसंतदादा साखर कारखान्याच्या तीन कार्यालयांना, वॉलमार्ट, हॉटेल, फर्निचर दुकाने व वैयक्तिक मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी बड्या थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला असून, कोणत्याही स्थितीत ही मोहीम थांबणार नाही, असेही स्पष्ट केले आहे. बड्या धेंडांवरील कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.
राज्य शासनाने महापालिकेला थकीत कराची शंभर टक्के वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आयुक्त खेबूडकर यांनी दोन दिवसांपासून घरपट्टी, पाणीपुरवठा विभागाची बैठक घेऊन कारवाईचे नियोजन केले. घरपट्टी थकबाकी वसुलीसाठी आयुक्तांनी तीन पथके नियुक्त केली आहेत. या पथकांना जप्तीचे अधिकार देण्यात आले. महापालिकेची चालू व थकीत घरपट्टीची ७५ कोटी रुपयांची मागणी आहे. त्यापैकी आजअखेर ४० कोटी ७५ लाख रुपयांची वसुली झाली आहे. अजूनही ३० कोटीची वसुली बाकी आहे. त्यापैकी किमान १५ कोटी रुपये मार्चअखेरपर्यंत वसूल करण्याचे नियोजन आयुक्तांनी केले आहे.
वॉरंट अधिकारी नितीनकाका शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अशोक मुळीक, सचिन पाटील, निखिल चोपडे, प्रकाश सर्जे, बंडू आंबी यांच्या पथकाने सकाळी कोल्हापूर रस्त्यावरील वॉलमार्टची इमारत सील केली. त्यांच्याकडे सव्वातीन लाखांची थकबाकी आहे. त्यानंतर ९ लाख ६७ हजार रुपयांच्या थकबाकीपोटी प्रकाश अ‍ॅग्रोच्या इमारतीलाही सील ठोकण्यात आले. सायंकाळी वसंतदादा साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली. वसंतदादा कारखान्याकडे १७ लाखाची थकबाकी आहे. कारखान्याने महापालिकेला करापोटी तीन धनादेश दिले होते. पण ते न वठल्याने गुरुवारी पथकाने कारखान्याच्या पर्चेस इमारत, जनरल इमारतीसह आणखी एका इमारतीला सील ठोकले. दिवसभरात पथकाने २५ थकबाकीदारांकडे वसुली केली. त्यापैकी दहाजणांनी तीन लाख रुपयांचा कर जमा केला आहे.
काका हलवाई यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या पथकाने सीताराम लोंढे यांच्याकडील दोन लाख ९० हजाराच्या थकबाकीपोटी मालमत्ता जप्त केली. राजूभाई शेख यांची ८५ हजाराची थकबाकी होती. त्यांच्याकडे पथक कारवाईला गेले असता त्यांनी धनादेश दिला. हॉटेल अनुराधावरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला. हॉटेल चालकांनी एक लाखाची रोकड व ७५ हजाराचा धनादेश दिला.
हॉटेल डिलक्सकडून ६० हजार रुपयांची रोख रक्कम, तर १ लाख २० हजार रुपयांचे धनादेश जमा करण्यात आले. त्यामुळे जप्तीची कारवाई टळली. (प्रतिनिधी)

Web Title: Vasantdada factory, Wal-Marta seal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.