म्हैसाळ योजनेसाठी वसंतदादा कारखाना एक कोटी भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2016 01:04 AM2016-02-07T01:04:24+5:302016-02-07T01:04:24+5:30

विशाल पाटील : थकबाकीच्या प्रश्नाची कोंडी फुटली

The Vasantdada factory will have to pay one crore for the Mhasal scheme | म्हैसाळ योजनेसाठी वसंतदादा कारखाना एक कोटी भरणार

म्हैसाळ योजनेसाठी वसंतदादा कारखाना एक कोटी भरणार

Next

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने दुष्काळी प्रश्नांची दखल घेत म्हैसाळ पाणी योजनेच्या आवर्तनासाठी एक कोटी रुपये भरण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून म्हैसाळ योजनेच्या थकित रकमेच्या प्रश्नाची कोंडी कारखान्याने फोडली आहे.
म्हैसाळ योजनेची १८ कोटी ४१ लाख रुपयांची थकबाकी आहे. एप्रिलपासूनच्या वीज बिलास ३३ टक्के सवलत मिळाली आहे. ती वजा केल्यास १४ कोटी ५१ लाख रुपये थकबाकी राहते. त्यापैकी किमान ७ कोटी २५ लाखांची रक्कम भरल्यास योजनेतून पाणीपुरवठा सुरू होऊ शकतो, हे पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी जानेवारीमध्ये झालेल्या बैठकीत खासदार व जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. या बैठकीत वीज बिलाच्या थकबाकीपोटी ‘म्हैसाळ’च्या लाभक्षेत्रातील साखर कारखानदारांनी सव्वापाच कोटी, तर उर्वरित दोन कोटी रक्कम शेतकऱ्यांकडून भरून घेण्याचा निर्णय झाला होता. मात्र, योजनेच्या लाभक्षेत्रात उसाचे प्रमाणच कमी असल्याने कारखानदारांसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे थकबाकीचा प्रश्न पुन्हा रेंगाळला होता. दिवसेंदिवस हा प्रश्न जटिल होत असल्याने वसंतदादा कारखान्याने कोंडी फोडली. मदतीचा पहिला हात या कारखान्याने देण्याचा निर्णय घेतला. पुढील हंगामात या भागातून ऊस पुरवठा होईल, या अपेक्षेने आगाऊ पैसे भरण्याचे आवाहन जानेवारीतील बैठकीत करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद देत वसंतदादा कारखान्याने हे पाऊल उचलले आहे.
कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील म्हणाले की, वसंतदादांच्या संकल्पनेतून ही योजना उभारली आहे. थकित रकमेसाठी योजना बंद पडत असेल, तर अशावेळी योजना सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याची जबाबदारी वसंतदादा कारखान्याचीच आहे. त्यामुळे आम्ही या भागातील शेतकऱ्यांसाठी एक कोटी रुपये भरण्याचा निर्णय घेतला आहे. योजनेच्या कार्यक्षेत्रातील अन्य कारखान्यांनीही पैसे भरण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The Vasantdada factory will have to pay one crore for the Mhasal scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.