‘वसंतदादा’कडून राख नियंत्रणासाठी यंत्रणा
By Admin | Published: February 13, 2016 12:08 AM2016-02-13T00:08:35+5:302016-02-13T00:25:59+5:30
कार्यवाही सुरू : प्रदूषण नियंत्रण मंडळाला लेखी पत्र
सांगली : वसंतदादा कारखान्याच्या राखेचे प्रदूषण रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. शुक्रवारी बॉयलरसाठी वेट स्क्रबरचे यंत्रही कारखाना स्थळावर दाखल झाले. दरम्यान, प्रदूषण नियंत्रण यंत्रणेसाठी कारखान्याने स्वतंत्र बँक खाते काढून त्यावर ७० लाख रुपयांची रक्कमही जमा केली.शुक्रवारी वसंतदादा कारखान्याने राख नियंत्रणासाठी पावले उचलली. प्रदूषण नियंत्रण योजनेसाठी एक कोटी रुपये लागणार आहेत. त्यापैकी ३० लाख रुपये कारखान्याने पुरवठादाराला दिले आहेत. उर्वरित ७० लाख रुपये बाजीरावआप्पा पाटील बँकेत स्वतंत्र खात्यावर वर्ग केले. कारखाना कार्यस्थळावर आज एक वेट स्क्रबर यंत्र आले आहे. कारखान्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिलेली बँक हमीची मुदत संपल्याने नूतनीकरणासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे. त्याबाबतचे लेखी पत्र शुक्रवारी कारखान्याने प्रदूषण मंडळाला दिले आहे. (प्रतिनिधी)
राख नियंत्रणास कारखाना कटिबद्ध : विशाल पाटील
वसंतदादा कारखान्याचे प्रदूषण रोखण्यासाठी आम्ही संचालक मंडळ कटिबद्ध आहोत. हा कारखाना शेतकऱ्यांचा आहे. चालू हंगामात कारखान्याने चांगले गाळप केले आहे. कारखान्याच्या राखेमुळे होणाऱ्या त्रासाची आम्हाला जाणीव आहे. त्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही प्रयत्न करीत आहोत. ३१ मेपर्यंत कारखान्याचे प्रदूषण रोखण्यात आम्हाला निश्चित यश येईल, असे कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी सांगितले.