वसंतदादा बॅँकेचे मुख्यालय विकणार : प्रस्ताव सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 12:37 AM2019-03-31T00:37:16+5:302019-03-31T00:38:39+5:30

अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या मुख्यालयाच्या इमारतीसह मुंबईतील इमारतही लिलावात काढण्यासाठी सहकार विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सहकार विभागाकडून मंजुरी मिळताच दोन्ही इमारतींच्या विक्रीची प्र्रक्रिया तातडीने

Vasantdada to sell bank headquarters: offer submission | वसंतदादा बॅँकेचे मुख्यालय विकणार : प्रस्ताव सादर

वसंतदादा बॅँकेचे मुख्यालय विकणार : प्रस्ताव सादर

Next
ठळक मुद्देअन्य मालमत्तांचाही लिलाव सुरू

सांगली : अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या मुख्यालयाच्या इमारतीसह मुंबईतील इमारतही लिलावात काढण्यासाठी सहकार विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सहकार विभागाकडून मंजुरी मिळताच दोन्ही इमारतींच्या विक्रीची प्र्रक्रिया तातडीने सुरू होणार आहे.

बॅँकेची सांगली-मिरज रस्त्यावर भव्य व काचेची मोठी इमारत आहे. आकर्षक रंगसंगतीत रंगलेली आलिशान कार्यालये, वतानुकूलित यंत्रणा, लिफ्ट अशा सर्व सेवासुविधांनीयुक्त अशी ही बॅँक अन्य खासगी बॅँकांच्या तुलनेत सर्वात चर्चेत होती. अमर्याद व असुरक्षित कर्जवाटपाने बॅँकेला अधोगतीचा मार्ग दाखविला. कोट्यवधी रुपयांची कर्जे थकीत झाली. आर्थिक ताळमेळ बिघडल्यानंतर अखेर ही बॅँक अवसायनात काढण्यात आली. रिझर्व्ह बॅँकेमार्फत वसंतदादा बॅँकेचा परवानाही निलंबित करण्यात आला. त्यानंतर मुख्यालयाच्या इमारतीतही निराशेचे वारे वाहू लागले. चारशेहून अधिक कर्मचारी असलेल्या या बॅँकेतील अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. कर्मचारी कपात होत होत आता इतक्या मोठ्या इमारतीमध्ये केवळ २२ कर्मचारीच काम करीत आहेत. राज्यातील एकूण शाखांचा विचार केला, तर सध्या केवळ २८ जणांचाच स्टाफ आहे. सांगलीच्या मुख्यालयाची घरपट्टी, विद्युत बिले व अन्य खर्च करणेही जिकिरीचे होत असून, कर्मचारी वर्गही अत्यंत कमी झाल्याने मुख्यालय विक्रीचा प्रस्ताव तयार होऊन तो मंजुरीसाठी आता सहकार विभागाकडे गेला आहे.

वसंतदादा बॅँकेच्या राज्यात एकूण १० मालकीच्या इमारती आहेत. यातील आठ मालमत्तांचा लिलाव अवसायकांमार्फत काढण्यात आला होता. फेब्रुवारी महिन्यात याची प्रक्रिया राबविण्यात आली. बॅँकेच्या वखारभाग धर्मरत्न कॉम्प्लेक्स, वखारभाग गांधी बिल्डिंग, सराफ कट्टा, मार्केट यार्ड या सांगलीतील इमारतींसह मिरजेतील स्टेशन रोड व लक्ष्मी मार्केटमधील दोन इमारतीसह अंकलखोप (ता. पलूस) व चिंचणी (ता. तासगाव) येथील इमारतींचा या लिलाव प्रक्रियेत समावेश होता. सांगली मार्केट यार्डातील लिलाव प्रक्रियेस मार्केट कमिटीच्या संचालकांनी हरकत घेतल्याने ही प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. अन्य इमारतींपैकी वखारभागातील दोन, सराफ कट्टा व मिरजेतील स्टेशन रोडच्या इमारतीसाठी एकही निविदा दाखल झाली नव्हती. मिरजेच्या लक्ष्मी मार्केटजवळील बॅँक इमारतीसाठी एक निविदा दाखल झाली होती, मात्र ती वाजवी किमतीपेक्षा कमी असल्याने ती प्रक्रिया रद्द केली होती. अंकलखोप आणि चिंचणी येथील लिलाव व बोलीची प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांची विक्री झालेली आहे. आता उर्वरीत इमारतींसाठी फेरनिविदा शक्य आहे.

अंकलखोपची इमारत : जिल्हा बॅँकेकडे

आठ इमारतींपैकी अंकलखोप आणि चिंचणी शाखांच्या इमारतींची विक्री झाली आहे. चिंचणी येथील इमारतीला बाजारमूल्यापेक्षा थोडासा जास्त दर मिळाला, मात्र अंकलखोपच्या विक्री व्यवहारात बॅँकेला मोठा लाभ झाला. २७ लाख ६० हजार इतके मूल्य निश्चित केले असताना या इमारतीस ५0 लाख ४० हजार रुपये मिळाले. जिल्हा बॅँकेने ही इमारत लिलावात खरेदी केली.
बॅँकेची आर्थिक स्थिती

बॅँकेची सध्या थकीत कर्जे १५९ कोटी ४५ लाख इतकी असून, ठेवींची रक्कम १५८ कोटींच्या घरात आहे. म्हणजेच येणी आणि देणी जवळपास समान आहेत. २६ फेब्रुवारी रोजी एकरकमी परतफेड योजनेची मुदत संपली असून, त्याबाबतची माहितीही सहकार विभागाला कळविण्यात आली आहे.

Web Title: Vasantdada to sell bank headquarters: offer submission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.