Sangli: वसंतदादा साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध, विशाल पाटील यांचे प्रयत्न यशस्वी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 17:26 IST2025-02-26T17:25:23+5:302025-02-26T17:26:25+5:30

वसंतदादांची चौथी पिढी राजकारणात

Vasantdada sugar factory election uncontested, MP Vishal Patil efforts successful | Sangli: वसंतदादा साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध, विशाल पाटील यांचे प्रयत्न यशस्वी 

Sangli: वसंतदादा साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध, विशाल पाटील यांचे प्रयत्न यशस्वी 

सांगली : वसंतदादा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत २१ जागांसाठी १४४ इच्छुकांनी अर्ज भरले होते. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी १२३ इच्छुकांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे २१ उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले. आष्टा, मिरज, सांगली आणि अनुसूचित जाती व जमाती गटात इच्छुकांची मनधरणी करून तिढा सोडविण्यात खासदार विशाल पाटील यशस्वी झाल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली.

वसंतदादा कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू होत्या. सोमवारी रात्री इच्छुकांची वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष खासदार विशाल पाटील यांनी बैठक घेतली होती. बहुतांश जागांवर सोमवारीच निर्णय झाला होता. पण आष्टा, मिरज, सांगली आणि अनुसूचित जाती -जमाती गटातील जागांवर इच्छुक जास्त होते. या जागांवर तोडगा सोमवारी निघाला नाही. पण, मंगळवारी दुपारी विशाल पाटील यांनी इच्छुकांची बैठक घेऊन संबंधित गटात अडीच-अडीच वर्षाची संधी देण्याचा तोडगा काढला.

पण, मिरज गटातून मिलिंद खाडीलकर यांनी अर्ज मागे घेतला नव्हता. अखेर विशाल पाटील यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर खाडीलकर यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतला. त्यानंतर कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ मावळे यांनी कारखान्याच्या सर्व २१ जागा बिनविरोध झाल्याचे घोषित केले. त्यानंतर विशाल पाटील समर्थक कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी केली.

कर्मचारी ते संचालकपदापर्यंतचा प्रवास

वसंतदादा कारखान्यामधील कर्मचारी बाळासो दादासो पाटील (बी. डी.) यांनी ३६ वर्षे सेवा केली. त्यानंतर ते सेवानिवृत्त झाले. या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी गटाकडून निवडणुकीसाठी अर्ज भरला होता. दादा गटाशी प्रामाणिक काम केल्यामुळे कारखान्याच्या संचालकपदी त्यांची बिनविरोध निवड झाली.

वसंतदादांची चौथी पिढी राजकारणात

माजी केंद्रीय राज्यमंत्री व वसंतदादांचे नातू प्रतीक पाटील यांचा मुलगा हर्षवर्धन यांची वसंतदादा कारखान्यात संचालकपदी निवड झाली. त्यांच्या माध्यमातून वसंतदादांची चौथी पिढी सहकारी संस्थेच्या माध्यमातून राजकारणात आली आहे.

वसंतदादा कारखान्याचे नूतन संचालक

सांगली गट : बाळासो पाटील, दिनकर साळुंखे, हर्षवर्धन पाटील.
मिरज गट : दौलतराव शिंदे, शिवाजी कदम, तानाजी पाटील.
आष्टा गट : संजय पाटील, ऋतुराज सूर्यवंशी, विशाल चौगुले.
भिलवडी गट : यशवंतराव पाटील, गणपतराव सावंत-पाटील, अमित पाटील.
तासगाव गट : अंकुश पाटील, उमेश मोहिते, गजानन खुजट.
उत्पादक सहकारी संस्था गट : खासदार विशाल पाटील.
अनुसूचित जाती -जमाती गट : विशाल चंदूरकर.
महिला सदस्या : सुमित्रा खोत, शोभा पाटील.
इतर मागासवर्गीय जाती गट : अंजुम लुकमान महात.
भटक्या विमुक्त जाती व जमाती गट : प्रल्हाद गडदे.

Web Title: Vasantdada sugar factory election uncontested, MP Vishal Patil efforts successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.