वसंतदादांना जयंतीदिनी सांगलीत अभिवादन, सर्वधर्मीय प्रार्थना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:53 PM2018-11-13T12:53:48+5:302018-11-13T12:55:56+5:30
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सहकारमहर्षी वसंतदादा पाटील यांच्या १0१ व्या जयंतीदिनी सांगलीत मंगळवारी स्मारकस्थळी अभिवादन कार्यक्रम पार पडला. वसंतदादांच्या कुटुंबियांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी गर्दी केली होती.
सांगली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सहकारमहर्षी वसंतदादा पाटील यांच्या १0१ व्या जयंतीदिनी सांगलीत मंगळवारी स्मारकस्थळी अभिवादन कार्यक्रम पार पडला. वसंतदादांच्या कुटुंबियांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी गर्दी केली होती.
कृष्णाकाठी वसंतदादांच्या स्मारकस्थळी सकाळी ९ वाजता अभिवादानाचा कार्यक्रम सुरू झाला. याठिकाणी सर्वधर्मीय प्रार्थना सादर करण्यात आली. वसंतदादांच्या जयंतीनिमित्त स्मारकाला फुलांनी सजविण्यात आले होते. स्टेशन चौकातील पुतळ््यासही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
स्मारकस्थळी सकाळी माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, प्रदेश महिला कॉंग्रेसच्या उपाध्यक्षा शैलजाभाभी पाटील, जयश्रीताई पाटील, आनंदराव मोहिते, राजन पिराळे आदी उपस्थित होते. वसंतदादांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्ती असल्याने विविध संस्थांमध्ये अभिवादनासह विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
वसंतदादा सांस्कृतिक महोत्सवास येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. यामध्ये संगीत, लोककला, गायन, विनोदी कार्यक्रम यांचा समावेश आहे. त्याचबरोबर सहकार बोर्डातर्फे सहकार सप्ताहास मंगळवारपासून सुरुवात झाली.
सहकारी विपणन, प्रक्रिया व साठवणूक, सेंद्रीय शेटी व बिनखर्च शेतीकरीता सहकारी सुत्रे, सहकाराच्या माध्यमातून मुल्यवर्धन व ओळख, सार्वजनिक, खासगी सहकारी भागीदारी, सहकाराच्या माध्यमातून शासकीय योजना जागरूकता व उत्पन्न निर्मिती अशा विविध विषयांवर परिसंवाद आणि कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.