‘वसंतदादा’ची निविदा एप्रिलच्या प्रारंभी
By admin | Published: March 30, 2017 12:41 AM2017-03-30T00:41:04+5:302017-03-30T00:41:04+5:30
जिल्हा बॅँकेत हालचाली गतिमान : कायदेशीर अभिप्राय विचारात घेऊन तयारी सुरू
सांगली : कर्जाच्या थकीत ९० कोटी रुपयांच्या वसुलीसाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेने ताब्यात घेतलेल्या वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची निविदा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निघण्याची चिन्हे आहेत. कायदेशीर अभिप्राय विचारात घेऊन कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याबाबतची तयारी सुरू झाली आहे.
सिक्युरिटायझेशनच्या अध्यादेशानुसार कारखाना ताब्यात घेतल्याबाबतची नोटीस बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली. कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्यासह सर्व संचालकांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जिल्हा बॅँकेने जानेवारी महिन्यात सिक्युरिटायझेशन अॅक्टनुसार कारखान्यास नोटीस बजावली होती. मार्चअखेर थकबाकीची रक्कम जमा केली नाही, तर एप्रिलमध्ये कारखान्याचा ताबा घेऊन कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्याची तयारी होती, मात्र कारखान्याने थकबाकी भरण्याबाबत कोणतीही हालचाल न केल्याने सिक्युरिटायझेशन अॅक्टनुसार जिल्हा बँकेने मंगळवारी कारखान्याचा प्रतीकात्मक ताबा घेतला. ९० कोटी ५५ लाख ४६ हजार इतकी थकबाकी असून, त्यावर १ जानेवारी २0१७ पासूनचे व्याजही आकारण्यात येणार आहे.
संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत कायदेशीर अभिप्राय मागविण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार आता अभिप्राय विचारात घेऊन कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याबाबत विचार सुरू झाला आहे. त्यासाठीची निविदा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच प्रसिद्ध होण्याची चिन्हे आहेत.
वसंतदादा कारखाना भाडेतत्त्वावर अन्य कारखान्यास चालविण्यास देण्याबाबतची मागणी यापूर्वीच्या अनेक वार्षिक सभांमध्ये सभासदांनी केली होती. अध्यक्षांनीही त्यानुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. वसंतदादा कारखाना सध्या तोट्यात आहे. अनेक देणी थकीत आहेत. त्यामुळे अन्य सक्षम कारखान्यास हा कारखाना चालविण्यास दिल्यास थकीत देणी भागविली जाऊ शकतात. कारखाना सुस्थितीत आल्यानंतर व करार संपल्यानंतर पुन्हा सभासदांच्या ताब्यात तो येऊ शकतो. त्यामुळेच विशाल पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्र व कर्नाटकातील सक्षम कारखान्यांशी चर्चा सुरू ठेवली होती.
दरम्यान, जिल्हा बँकेने थकबाकीपोटी कारवाई करून कारखाना ताब्यात घेतला असून, भाडेतत्त्वावर कारखाना चालविण्यास देण्याबाबतचा सर्व अधिकार आता जिल्हा बँकेस प्राप्त झाला आहे. (प्रतिनिधी)