जयंत पाटील समर्थकांना वसंतदादांच्या नावाची अॅलर्जी
By admin | Published: March 1, 2016 11:31 PM2016-03-01T23:31:08+5:302016-03-02T00:49:14+5:30
पंचायत समिती सभागृह नामकरण : पुन्हा आंदोलन पेटणार
अशोक पाटील--इस्लामपूर --वाळवा पंचायत समितीतील जुन्या सभागृहाला असलेले वसंतदादा पाटील यांचे नाव पुसणार नाही, अशी ग्वाही सभापती रवींद्र बर्डे यांनी दिली होती. परंतु सत्ताधारी राष्ट्रवादीतील नेत्यांना वसंतदादांच्या नावाची अॅलर्जी आहे. तालुक्यात वसंतदादांचे नाव असलेले एकमेव सभागृह जमीनदोस्त करण्यात आले आहे, तर नवीन इमारतीतील सभागृहाला लोकनेते राजारामबापू पाटील यांचे नाव देण्याचा घाट घालण्यात आला आहे. याला जि. प. सदस्य सम्राट महाडिक, पं. स. सदस्य प्रकाश पाटील यांनी वेळोवेळी विरोध केला आहे. यापुढेही हा विरोध कायम ठेवून सभागृहाला वसंतदादांचेच नाव देण्यासाठी पुन्हा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा पं. स. सदस्य प्रकाश पाटील यांनी दिला आहे.
‘लोकमत’शी बोलताना प्रकाश पाटील म्हणाले, वाळवा तालुक्यातील शासकीय, निमशासकीय, सहकारी इमारतींना लोकनेते राजारामबापू पाटील यांचे नाव देण्यासाठी राष्ट्रवादीतील बहुतांशी नेते सरसावलेले दिसतात. त्यांच्या उद्योग समूहातील संस्थांना राजारामबापूंचे नाव देण्यासाठी आमचा विरोध नाही. परंतु शासन निर्णयाने ज्या सभागृहाला वसंतदादा पाटील यांचे नाव दिले होते, त्याठिकाणी शासन निर्णयाचा अपमान करुन सभापती रवींद्र बर्डे यांनी तत्कालीन गटविकास अधिकारी विजय जाधव यांच्यावर दबाव आणून वसंतदादांचे नाव पुसले आहे.
याविरोधात युवा नेते, जि. प. सदस्य सम्राट महाडिक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन, उपोषण करूनही सत्ताधाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. याउलट वसंतदादांचे नाव असलेले जुने सभागृह जमीनदोस्त करून विरोधकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. आंदोलन, उपोषण केल्यानंतर महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग पत्र क्र. झेडपी/२०१५/सक्र/७२८/परा- १ दि. २ डिसेंबर २०१५ अन्वये इतर ३ पत्रांच्या आदेशान्वये सत्ताधारी राष्ट्रवादी शासन निर्णयाची अंमलबजावणी का करते, याचा खुलासा मागितला असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.
वसंतदादा पाटील यांच्या २७ व्या पुण्यतिथीनिमित्त सांगली जिल्ह्यातील दादाप्रेमी एकत्र येऊन पुन्हा जनआंदोलनाचा रेटा छेडण्याचा निर्णय घेणार असल्याचे प्रकाश पाटील यांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा वसंतदादांच्या नामकरणाचा मुद्दा पेटणार आहे.
तेव्हा पदे : आता विरोध
वसंतदादा पाटील यांच्या आशीर्वादाने राजकारणात पदार्पण करून वाळवा तालुक्यातील अनेकांनी वजनदार पदे उपभोगली आहेत. त्याच नेत्यांना आता वसंतदादांच्या नावाची अॅलर्जी का झाली आहे, असा सवाल सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे.
निव्वळ राजकारण...
सभापती रवींद्र बर्डे हे स्वातंत्र्यसैनिक दादासाहेब बर्डे गुरुजी यांचे चिरंजीव आहेत. बर्डे गुरुजी हे स्वातंत्र्यपूर्व काळात वसंतदादांसोबत कार्यरत होते. परंतु सभापती रवींद्र बर्डे हे सत्तेच्या खुर्चीसाठी वसंतदादांच्या नावाला विरोध करत ही बाब अत्यंत निंदनीय असल्याचा आरोप प्रकाश पाटील यांनी केला आहे.
माजी मुख्यमंत्री वसंतदादांचे नाव असलेल्या सभागृहाची इमारत धोकादायक बनली होती. त्यामुळे ती इमारत उतरावावी लागत आहे. वसंतदादांच्या नावाची आम्हाला अॅलर्जी नाही, उलट आम्हाला त्यांचा आदरच आहे. नवीन इमारतीतील सभागृहाला वसंतदादांचे नाव देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- रवींद्र बर्डे, सभापती, वाळवा पंचायत समिती