विशाल पाटील गटाचे बाहुबल वाढणार
By admin | Published: March 17, 2016 10:48 PM2016-03-17T22:48:20+5:302016-03-17T23:37:21+5:30
स्वाभिमानी आघाडीशी चर्चा : मदनभाऊ गटासह विरोधी राष्ट्रवादीला शह देण्याच्या हालचाली
शीतल पाटील - सांगली --महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसमधील विशाल पाटील गट व विरोधी स्वाभिमानी विकास आघाडी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे पालिकेतील या गटाचे संख्याबळ आणखी नऊ सदस्यांनी वाढणार आहे. यासंदर्भात गुरुवारी दोन्ही गटातील प्रमुख नगरसेवकांची बैठकही झाली. सध्या तरी शहराच्या विकासासाठी एकत्र असल्याचा दावा केला जात असून, या एकत्रिकरणातून पालिकेतील मदनभाऊ पाटील गट व राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्याचा राजकीय डावपेच असल्याची चर्चा आहे.महापालिकेत काँग्रेसचे ४०, राष्ट्रवादी काँग्रेसचे २६, तर स्वाभिमानी आघाडीचे ११ सदस्य आहेत. पालिकेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच सांगलीच्या जनतेने काँग्रेसला बहुमत दिले होते. काँग्रेस सत्ता काळाचा पहिल्या अडीच वर्षाचा टप्पा पूर्ण झाला आहे. या काळात काँग्रेसचे नेते मदनभाऊ पाटील यांचेच एकहाती वर्चस्व राहिले. महापौर पदापासून ते अगदी स्थायी समिती सदस्यापर्यंतच्या निवडी मदनभाऊंच्या आदेशानेच होत होत्या. पण त्यांच्या निधनानंतर पालिकेतील सत्ताकारण बदलले आहे. त्याची सुरुवात खऱ्याअर्थाने जिल्हा बँक व बाजार समितीच्या निवडणुकीपासूनच झाली होती. या दोन्ही निवडणुकीत मदनभाऊंनी त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्याशी आघाडी केली होती.
सध्या सत्ताधारी काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली आहे. त्याचा प्रत्यय महापौर, उपमहापौर निवडीवेळी आला. आतापर्यंत पालिकेच्या राजकारणापासून दूर असलेल्या काँग्रेसमधील वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्या गटाने पहिल्याच प्रयत्नात उपमहापौरपद पदरात पाडून घेतले. या गटाकडे १२ ते १५ नगरसेवकांचे बळ आहे. त्या जोरावर सध्या पालिकेत या गटाचा स्वतंत्र कारभार सुरू आहे. त्याची सूत्रे नगरसेवक शेखर माने यांच्याकडे आहेत. अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन स्वत:च्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व दाखविले जात आहे. तरीही सत्ताधारी काँग्रेसमध्ये मदनभाऊ गटाचेच संख्याबळ अधिक आहे. आजही २० ते २२ नगरसेवक या गटाचे म्हणून ओळखले जातात. त्यांच्यात मतभेद असले तरी, ‘मनभेद’ नाहीत. मदनभाऊंच्या पश्चात त्यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांचा शब्द ते अंतिम मानत आहेत. पुढील अडीच वर्षाच्या काळात पालिकेच्या सत्तासंघर्षात मदनभाऊ गटाचाच वरचष्मा राहण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत आता काँग्रेसमधील विशाल पाटील गटाचे बाहुबल वाढविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी विरोधी स्वाभिमानी आघाडीला गळ घातली जात आहे. गुरुवारी विशाल गट व स्वाभिमानी आघाडीच्या प्रमुख नगरसेवकांची गुप्त बैठक झाली. या बैठकीत दोन्ही गट एकत्र करण्यावर चर्चा झाल्याचे समजते. भविष्यात दोन्ही गट एकत्र आले, तर या गटाचे संख्याबळ २२ ते २३ च्या घरात पोहोचणार आहे. म्हणजेच मदनभाऊ गटाच्या बरोबरीने विशाल पाटील गटाचेही संख्याबळ राहील. त्यातून भविष्यात पालिकेतील प्रमुख पदावर हक्क सांगता येईल. नुकत्याच झालेल्या महापौर निवडीवेळी विशाल पाटील गटाने दिलेल्या ऊर्जेमुळे स्वाभिमानीच्या नगरसेवकांनी काँग्रेसला हात उंचावून मदत केली होती. पालिकेत स्वाभिमानी आघाडी व राष्ट्रवादी नेते आ. जयंत पाटील यांचे राजकीय संबंध जगजाहीर आहेत. स्वाभिमानीतील एका गटाचा जयंतरावांना विरोध आहे. त्यात मदनभाऊ गट व राष्ट्रवादीत फारसा संघर्ष राहिला नाही. गेल्या वर्षभरापासून राष्ट्रवादीने मदनभाऊ गटाशी सलोखा राखला आहे. त्यामुळे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, या न्यायाने आता विशाल पाटील गट व स्वाभिमानी एकत्र येण्याची चर्चा आहे.
पूर्वीचाच सलोखा : नवीन समीकरणे
कॉँग्रेसमधील विशाल पाटील गट व स्वाभिमानी आघाडीच्या नेत्यांचे संबंध फार पूर्वीपासून सलोख्याचे राहिले आहे. दोघांचेही पक्ष वेगळे असले, तरी एकमेकांना मदत करताना त्यांनी कधी हात आखडता घेतलेला नाही. लोकसभा निवडणुकीवेळी त्यांचे राजकीय सख्य काही प्रमाणात उघड झाले होते. आता पालिकेच्या राजकारणात त्याला मूर्तस्वरुप दिले जात आहे. दोन्ही गटाने एकमेकांच्या हातात हात घालून सांगलीचे राजकारण करण्याची परंपरा फार जुनीच आहे. ही परंपरा पुढील पिढीच्या माध्यमातून कायमठेवून नवीन समीकरणे जुळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पदावरही दावा होणार
स्वाभिमानी आघाडी व विशाल पाटील गट एकत्र आल्यास त्यांचे संख्याबळ २२ ते २३ च्या घरात जाईल. त्यामुळे दोन्ही गटाकडून विविध पदांवर हक्क सांगितला जाणार आहे. त्याची सुरुवात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या प्रभाग समिती सभापती निवडीवेळी होईल. प्रभाग समिती दोनमध्ये काँग्रेस अल्पमतात आहे. या समितीचे सभापतीपद स्वाभिमानीला देण्यात येईल. तसेच शिक्षण मंडळात बाळू गोंधळी व जगन्नाथ ठोकळे यांची वर्णी लावली जाणार आहे. तसा शब्द विशाल पाटील गटाने स्वाभिमानीला दिला आहे.
महापालिकेच्या कामकाजात स्वाभिमानी आघाडीचे काँग्रेसला नेहमीच सहकार्य राहिले आहे. महापौर निवडीवेळीही त्यांनी सहकार्य केले होते. शहराच्या विकासासाठी आम्ही एकत्रित चर्चा करत असतो. तशीच बैठक गुरुवारी झाली. आम्ही विकासकामासाठी एकत्र आहोत.
- शेखर माने, नगरसेवक