कालबाह्य झालेल्या व्हॅटचे भूत आता कर्मचाऱ्यांच्या मानगुटीवर, जीएसटीची उलटी वाटचाल?

By संतोष भिसे | Published: October 16, 2022 04:26 PM2022-10-16T16:26:14+5:302022-10-16T16:26:21+5:30

पाच वर्षांपूर्वीच संपुष्टात, पण नोव्हेेंबरमध्ये पुन्हा परीक्षा.

vat discontinued in 2017 now again exams in novermber what about gst | कालबाह्य झालेल्या व्हॅटचे भूत आता कर्मचाऱ्यांच्या मानगुटीवर, जीएसटीची उलटी वाटचाल?

कालबाह्य झालेल्या व्हॅटचे भूत आता कर्मचाऱ्यांच्या मानगुटीवर, जीएसटीची उलटी वाटचाल?

Next

सांगली : व्हॅटचा जमाना २०१७ मध्येच संपला, पण राज्य जीएसटीच्या नोव्हेंबरमधील खात्यांतर्गत परीक्षेत मात्र दोन स्वतंत्र पेपर व्हॅटसंदर्भात आहेत. कालबाह्य झालेल्या व्हॅटचा विषय पुन्हा कशासाठी? असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कायदे, नियमांबाबत अद्यावत असावे यासाठी परीक्षा घेतली जात आहे. राज्यभरातील कर्मचाऱ्यांसाठी १ ते ४ नोव्हेंबरदरम्यान विविध केंद्रांवर परीक्षा होईल. ती सक्तीची आहे. चार दिवसांत सात पेपर सोडवावे लागतील. सहा पेपर प्रत्येकी १०० गुणांचे व शेवटचा पेपर ५० गुणांचा आहे. यातील प्रत्येकी १०० गुणांचे दोन पेपर पूर्णत: व्हॅट विषयावर आहेत.

केंद्र शासनाने व्हॅट करप्रणाली २०१७ मध्ये संपुष्टात आणली, त्याऐवजी जीएसटी लागू केला. गेली पाच वर्षे केंद्र आणि राज्य जीएसटीचे अधिकारी, कर्मचारी जीएसटीचेच काम करत आहेत. पण परीक्षेला दोन पेपर व्हॅटचे असल्याने पुन्हा एबीसीडी गिरवावी लागणार आहे.

पुस्तके नाहीत, अभ्यास कसा करायचा?
व्हॅट संपल्याने त्याची पुस्तके उपलब्ध नाहीत. अधिकृत संकेतस्थळांवरुन शासनाने तपशीलही हटवला आहे. त्याचे सॉफ्टवेअर, दावे, कायदे याचा तपशील पुरेसा उपलब्ध नाही. या स्थितीत अभ्यास कसा करायचा? असा प्रश्न कर्मचाऱ्यांपुढे आहे. जीएसटीची परीक्षा झाली असती, तर कर्मचारी आणखी अद्यावत झाले असते असे कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे.

ऐन दिवाळीत अभ्यास
१ ते ४ नोव्हेंबरदरम्यान परीक्षा आहे, त्यामुळे दिवाळीच्या सुट्यांचा आनंद घेण्याऐवजी परीक्षेचा अभ्यास करत बसावे लागणार आहे. परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी कर्मचारी संघटनेने आयुक्तांकडे केली, पण सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.

व्हॅट संपला, तरी त्याचे अनेक दावे अद्याप सुरुच आहेत, त्यामुळे व्हॅटची माहिती आवश्यकच आहे. परीक्षेचा अभ्यासक्रम ठरविण्याचे सर्वाधिकार खात्याकडे असतात, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्यावर आक्षेप घेणे निरर्थक ठरते. दिवाळीच्या सुटीत परीक्षेसाठी वर्गखोल्या उपलब्ध होतात, त्यामुळेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या आहेत.
विनोद देसाई,
अध्यक्ष, राजपत्रित कर्मचारी व अधिकारी संघटना,
वस्तु व सेवा कर विभाग, महाराष्ट्र

Web Title: vat discontinued in 2017 now again exams in novermber what about gst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.