Sangli: तब्बल १५ कोटींचा ‘व्हॅट’ चुकवला, कुपवाडला दोघा व्यापाऱ्यांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 12:55 PM2024-01-20T12:55:32+5:302024-01-20T12:55:52+5:30
कुपवाड : सावळी (ता. मिरज) येथील महालक्ष्मी डिस्ट्रिब्युटर्सच्या राजेंद्र भंवरलाल लड्डा व सुशांत राजेंद्र लड्डा (रा. शिवरत्न कॉम्प्लेक्स, कॉलेज ...
कुपवाड : सावळी (ता. मिरज) येथील महालक्ष्मी डिस्ट्रिब्युटर्सच्या राजेंद्र भंवरलाल लड्डा व सुशांत राजेंद्र लड्डा (रा. शिवरत्न कॉम्प्लेक्स, कॉलेज कॉर्नर) यांनी सात वर्षात १५ कोटी १२ लाख ५३ हजार ९६३ रुपयाचा मूल्यवर्धित कर अर्थात ‘व्हॅट’ चुकवल्याबद्दल कुपवाड एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत ‘जीएसटी’चे राज्य कर निरीक्षक वैभव माने यांनी फिर्याद दिली आहे.
अधिक माहिती अशी, राजेंद्र लड्डा व सुशांत लड्डा यांची मे. महालक्ष्मी डिस्ट्रिब्युटर्स नावाने कंपनी आहे. त्यांचा गरम मसाले, प्लास्टिक ग्रॅन्युअल्स व इलेक्ट्रिक वस्तू विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या कंपनीच्या व्यवसायाचे ठिकाण सावळी येथे आहे. हा व्यवसाय त्यांनी मूल्यवर्धित कर कायदा २००२ अंतर्गत नोंदवला होता. लड्डा यांनी व्यापार करताना १ एप्रिल २००७ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत व्हॅट आणि त्याची शास्ती अशी १५ कोटी १२ लाख ५३ हजार ९६३ रुपये रक्कम चुकवली होती.
व्हॅट चुकवल्याबद्दल फेब्रुवारी २०२२ व एप्रिल २०२३ मध्ये दोनवेळा नोटीस बजावण्यात आली होती. नोटिसीला त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. खुलासाही केला नाही. त्यामुळे राज्य कर उपायुक्त (जीएसटी) यांनी लड्डा यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार निरीक्षक माने यांनी व्हॅट कायदा २००२ च्या कलम ७४ (२) नुसार कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. लड्डा यांनी २००७ ते २०१४ या काळात १५ कोटी १२ लाख ५३ हजार ९६३ रुपयाचा व्हॅट चुकवल्यामुळे दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.