Sangli: चौदा कोटी ७९ लाखांचा व्हॅट चुकवला, दोघा व्यापाऱ्यांवर गुन्हा
By घनशाम नवाथे | Published: August 16, 2024 07:24 PM2024-08-16T19:24:12+5:302024-08-16T19:24:42+5:30
सांगली : कुपवाड एमआयडीसीतील नवमहाराष्ट्र चाकण ऑईल मिलने तब्बल १४ कोटी ७९ लाख १८ हजार ५२ रूपयांचा मुल्यवर्धित कर ...
सांगली : कुपवाड एमआयडीसीतील नवमहाराष्ट्र चाकण ऑईल मिलने तब्बल १४ कोटी ७९ लाख १८ हजार ५२ रूपयांचा मुल्यवर्धित कर (व्हॅट) चुकवल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत नवमहाराष्ट्र चाकणचे व्यापारी योगेश नरसुदास शेठ (वय ५६, रा. सिप्ला फाऊंडेशनजवळ, वारजे, पुणे) व मदन मोतीलाल बोरा (वय ६२, रा. नवमहाराष्ट्र हाऊस, शनिवार पेठ, पुणे) या दोघांविरूद्ध कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राज्य कर निरीक्षक वैभव माने यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
जीएसटी विभागाने दिलेली माहिती अशी, व्यापारी योगेश शेठ व मदन बोरा यांचा पशु खाद्य, खाद्य तेल, सरकी पेंड आदी वस्तूंचे उत्पादन व विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांची मे. नवमहाराष्ट्र चाकण ऑईल मिल कुपवाड एमआयडीसीमध्ये आहे. त्यांचा व्यवसाय महाराष्ट्र मुल्यवर्धित कर कायदा २००२ नुसार नोंदवण्यात आला आहे. त्यांनी दि. १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१७ अखेर मुल्यवर्धित कर (व्हॅट) तसेच त्यावरील व्याज, शास्ती भरली नाही.
थकीत व्हॅट भरण्यासाठी नवमहाराष्ट्र चाकणचे योगेश शेठ यांना दि. २२ फेब्रुवारी व दि. ९ जुलै २०२४ रोजी आणि मदन बोरा यांना दि. २४ जुलै २०२४ रोजी नोटीस बजावली. त्यानंतर त्यांनी कर भरणा केला नाही. त्यामुळे व्हॅट कायद्यातील कलमानुसार त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. या नोटीस नोंदणीकृत ई-मेलवर बजावण्यात आली. परंतू नोटीसीबाबत त्यांनी कोणताही खुलासा केला नाही किंवा उत्तर दिले नाही.
नवमहाराष्ट्र चाकणकडील थकीत व्हॅटचा भरणा करण्यासाठी शेठ आणि बोरा यांनी कोणताही प्रतिसाद दिला नसल्याने सांगलीचे राज्यकर उपायुक्त यांनी निरीक्षक वैभव माने यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार माने यांनी शेठ व बोरा यांच्याविरूद्ध कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दि. १ एप्रिल २०१३ ते दि. ३१ मार्च २०१७ या कालावधीत १४ कोटी ७९ लाख १८ हजार ५२ रूपयांचा व्हॅट चुकवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुपवाड पोलिस अधिक तपास करत आहेत.