लक्ष्मी पूजनाच्या मुहुर्तावर विड्याच्या पानांचा बाजार तेजीत, मिरजमधून मोठ्या प्रमाणात निर्यात
By संतोष भिसे | Published: November 13, 2023 03:45 PM2023-11-13T15:45:59+5:302023-11-13T15:46:17+5:30
बेडग : विड्याच्या पानांचा दिवाळीच्या मुहुर्ताचा बाजार चांगलाच तेजीत राहिला. रविवारी लक्ष्मी पूजनाच्या मुहुर्तावर पानाचे आगर असलेल्या मिरज पूर्व ...
बेडग : विड्याच्या पानांचा दिवाळीच्या मुहुर्ताचा बाजार चांगलाच तेजीत राहिला. रविवारी लक्ष्मी पूजनाच्या मुहुर्तावर पानाचे आगर असलेल्या मिरज पूर्व भागातून मोठ्या प्रमाणात निर्यात झाली.
सध्या कळी पानाचा हंगाम सुरु असून मार्गशीर्ष महिन्यात उतरण सुरु होईल. तत्पूर्वी लक्ष्मी पूजनाच्या मुहुर्ताला शेतकऱ्यांनी सौद्यासाठी पाने आणली होती. बेडग, नरवाड, आरग, मालगाव, भोसे, एरंडोली, म्हैसाळ, विजयनगर, मल्लेवाडी आदी गावांतून मुहुर्ताचा माल पान अड्ड्यांवर आला होता. कळी पानाच्या डप्पीला ५०० रुपयांपासून ३००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. एका डप्पीमध्ये तीन हजार पाने असतात. ही पाने कोकण, मराठवाडा, पुणे, मुंबई, पंढरपूर, सोलापूरसह कोल्हापुरला पाठविण्यात आली.
गेल्या काही वर्षांत खाऊच्या पानांचे सौदे गावोगावी सुरु झाले आहेत. खरेदीसाठी बाहेरगावाहून दलाल येतात. जागेवर सौदा आणि जागेवर पैसे अशा रोकड्या व्यवहारांमुळे शेतकऱ्यांनाही चांगला भाव आणि ताजा पैसा मिळू लागला आहे. लक्ष्मी पूजनाच्या मुहुर्ताला चांगला भाव मिळतो हे अपेक्षित धरुन शेतकऱ्यांनी रविवारी मोठ्या प्रमाणात पाने आणली होती. अपेक्षेनुसार चंगला भाव मिळालादेखील. चांगल्या दर्जाच्या कळी पानाला अडीच हजार रुपयांपर्यंतचा दर मिळाला. म्हणजे एका पानाला तब्बल ८५ पैसे किंमत मिळाली.
दिवाळीच्या सौद्यांसाठी शेतकऱ्यांनी सजवून-धजवून डप्पी आणली होती. पान अड्ड्यांवर रोषणाई केली होती. फटाक्यांच्या आतषबाजीत मुहुर्ताचे सौदे निघाले.
बाजार तेजीतच राहणार
गेल्या काही वर्षांत पानमळे झपाट्याने कमी झाले आहेत. पानमळ्याची शेती खर्चिक, वातावरणाला संवेदनशील आणि बाजाराच्यादृष्टीने बेभरवशाची झाली आहे, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पानमळे तोडून टाकले आहेत. त्या जागी ऊस किंवा द्राक्षबागा केल्या आहेत. साहजिकच पानांचे उत्पादन कमी झाले आहे. मागणी मात्र कायम आहे. त्यामुळे आगामी वर्षभर पानबाजार तेजीत राहील असे दलालांनी सांगितले.
लक्ष्मी पूजनाच्या सौद्याच्या मुहुर्ताना पानबाजार तेजीत राहिला. दरही चांगला मिळाला. बेडगमधून कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पाने पाठविली जातात. सौद्यांना शेतकऱ्यांचा प्रतिसाद चांगला होता. - शशिकांत नलवडे, पान दलाल, बेडग