गाडी सुरू करताना उडाला भडका, पेट घेतल्याने भाजी विक्रेत्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 10:26 PM2021-06-07T22:26:15+5:302021-06-07T22:27:20+5:30
विटा येथील घटना : मोटार सुरू करताना आगीचा भडका
विटा (सांगली) : मोटारीत भाजीपाला व अन्य किराणा साहित्य भरून विक्रीसाठी घेऊन जात असताना मोटार सुरू करताच अचानक मोटारीने पेट घेतल्याने त्यात शंभर टक्के भाजून रघुनाथ रामचंद्र ताटे (वय ५०, शाहूनगर, विटा) या भाजी विक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास शाहूनगर (विटा) येथे घडली.
विटा येथील रघुनाथ ताटे यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. भाजीपाला घेऊन जाण्यासाठी ते मारुती ८०० मोटारीचा (क्र.-एम.एच. ०१-व्ही-२४०९) चा वापर करतात. सोमवारी पहाटे भाजीपाला आणि अन्य जीवनावश्यक वस्तू मोटारीत भरून विक्रीसाठी जात होते. त्यांच्या घरासमोर त्यांनी मोटार सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी अचानक मोटारीतील वायरिंगने पेट घेऊन मोठा स्पोट झाला. त्यावेळी क्षणार्धात मोटारीत आगीचा भडका झाला. ताटे हे स्टेरिंगजवळ असल्याने गाडीतून त्यांना बाहेर येता आले नाही. तेथील नातेवाईक व स्थानिक लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यात त्यांना यश आले नाही. संपूर्ण मोटारीला आतील बाजूने आगीने वेढा दिल्याने भाजी विक्रेते रघुनाथ ताटे यांचा मोटारीतच भाजून जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती नगरसेवक अजित गायकवाड यांनी विटा पोलिसांना दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची पोलिसात नोंद झाली असून पोलीस उपनिरीक्षक पी. के. कन्हेरे पुढील तपास करीत आहेत.