मुंबईची बाजारपेठ थांबल्यामुळे भाजीपाला तेलंगणा, कर्नाटकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:26 AM2021-04-17T04:26:06+5:302021-04-17T04:26:06+5:30
सांगली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रात लॉकडाऊन असल्यामुळे मुंबई, पुणे शहरांतील भाजीपाल्याची मागणी घटली आहे. मुंबई, पुणेला रोज सांगली ...
सांगली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रात लॉकडाऊन असल्यामुळे मुंबई, पुणे शहरांतील भाजीपाल्याची मागणी घटली आहे. मुंबई, पुणेला रोज सांगली जिल्ह्यातून १२० ते १३० टनांपर्यंत भाजीपाला जात होता. सध्या २० ते ३० टनही भाजीपाल्याचा तेथे उठाव होत नसल्यामुळे शेतकऱ्यांनीच मुंबई, पुणेऐवजी कर्नाटक, तेलंगण राज्यात भाजीपाला पाठविण्यास सुरुवात केली आहे. पण, तेथेही वांगी, टोमॅटो, कोबी, ढोबळी मिरचीचे दर ५० टक्क्यांनी घटले आहेत.
जिल्ह्यातील वाळवा, मिरज, आटपाडी, तासगाव, खानापूर, पलूस तालुक्यांतून वांगी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, हिरवी मिरची, ढोबळी मिरचेच बारा ते तेरा ट्रक माल रोज मुंबई, पुण्यात जात होते. लॉकडाऊन लागण्यापूर्वी ढोबळी मिरचीला किलो ४० ते ४५ रुपये, वांगी, १८ ते २०, टोमॅटो ३०, कोबी १० ते १५, फ्लॉवर १० ते १५ आणि हिरवी मिरचीला ३५ रुपये किलो दर होता. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून या दरात ५० टक्क्यांनी घट झाली आहे. रोज मुंबई, पुण्याला बारा ते तेरा ट्रकमधून १२० ते १३० टन भाजीपाला जात होता. लॉकडाऊन लागल्यामुळे मुंबई, पुणे येथील भाजीपाला विक्रेत्यांची विक्रीच बंद झाली आहे. यामुळे दहा ते पंधरा टन भाजीपाला गेला तरीही खपत नसल्याच्या व्यापाऱ्यांच्या तक्रारी आहेत. ढोबळी मिरचीला ४५ रुपये किलोचा दर सध्या १२ रुपये झाला आहे. वांगी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवरचे दर खूपच गडगडले आहेत. मुंबई, पुणे येथील बाजारपेठ थांबल्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन भाजीपाला कर्नाटकातील म्हैसूर, हसन, बंगलोर आणि तेलंगणा राज्यांतील हैदराबादला पाठवीत आहेत. पण, येथेही वाहतुकीचा खर्च वजा जाता वांगी, टोमॅटो, दोडका, ढोंबळी मिरची, कोबी, फ्लॉवरला किलोला तीन ते चार रुपयेच शेतकऱ्यांच्या पदरात पडत आहे. या पैशातून उत्पादन खर्चही मिळत नाही, तरीही शेतात पीक सडण्यापेक्षा मिळेल त्या दराने शेतकरी शेतमालाची विक्री करीत आहे.
चौकट -
भाजीपाला विक्रीस बंदी नसतानाही व्यापाऱ्यांनी दर पाडले
शासनाने लॉकडाऊनमधून भाजीपाला विक्रीवर कोणतेही बंदणे घातले नाहीत. तरीही मुंबई, पुणे येथील मोठ्या व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनच्या नावाखाली भाजीपाल्याचे दर पाडल्यामुळे शेतकरी खूप मोठ्या आर्थिक संकटात आहे. कवडीमोल दराने भाजीपाल्याची विक्री होत आहे, याकडे राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रीया भाजीपाला उत्पादक शेतकरी महादेव पाटील यांनी दिली.