सांगलीत विद्यार्थ्यांची शाकाहारी दिंडी : शाकाहार प्रसारासाठीचा अनोखा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 07:46 PM2018-10-13T19:46:38+5:302018-10-13T19:50:45+5:30
शाकाहाराचे महत्त्व सांगणारे फलक, हलगीच्या कडकडाटावर रंगलेली लेझिम पथके, झांजपथक, टाळ-मृदंगाचा निनाद अशा उत्साही वातावरणात काढण्यात आलेल्या शाकाहार दिंडीने शनिवारी सांगलीकरांचे लक्ष वेधले.
Next
ठळक मुद्देआज संमेलन -नियमसागर महाराज म्हणाले की, शाकाहारामुळे शरीर निरोगी राहते.
सांगली : शाकाहाराचे महत्त्व सांगणारे फलक, हलगीच्या कडकडाटावर रंगलेली लेझिम पथके, झांजपथक, टाळ-मृदंगाचा निनाद अशा उत्साही वातावरणात काढण्यात आलेल्या शाकाहार दिंडीने शनिवारी सांगलीकरांचे लक्ष वेधले. रविवारी १४ आॅक्टोबर रोजी येथील नेमिनाथनगरमध्ये होणाºया शाकाहार संमेलनानिमित्त ही दिंडी काढण्यात आली होती.
ंिदंडीची सुरुवात नेमिनाथनगर येथे चातुर्मास कमिटीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्याहस्ते करण्यात आली.
यावेळी राजमती गर्ल्स हायस्कूल अध्यक्ष महावीर शेटे, कळंत्रेआक्का प्राथमिक विद्यामंदिरचे अध्यक्ष मोहन चौगुले, राजू चौगुले, सुहास पाटील, वसंत पाटील, राजगोंडा पाटील, सुभाष देसाई, सचिन आळतेकर, सागर पाटील आदी उपस्थित होते. एक हजारहून अधिक विद्यार्थी या दिंडीत सहभागी झाले होते.
या दिंडीत महात्मा गांधी यांची प्रतिमा असलेली पालखी अग्रभागी होती. फळे, भाजीपाला यांच्या प्रतिमांनी पालखी सजविण्यात आली होती. शहरातून ही दिंडी फिरून नेमिनाथनगर येथे आली. याठिकाणी मुनिश्री सागर महाराज, नियमसागर महाराज यांच्या उपस्थितीत नववीच्या विद्यार्थिनीने राजू कांबळे रचित शाकाहार गीत गायले. यावेळी मोहन चौगुले, महावीर शेटे, मुसा तांबोळी, मीनाक्षी वाझे, सुनील पाटील, प्रमोद खंजिरे, आनंद पाटील, राजू कांबळे, प्रसन्न शेटे, अमर पाटील, प्रा. डॉ. शोभा पाटील, अजिंक्य पाटील यांचा दिंडीच्या उत्कृष्ट संयोजनाबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना मुनिश्री सागर महाराज यांनी मार्गदर्शन केले.
ते म्हणाले की, शाकाहार हाच सर्वोत्कृष्ट आहार आहे. शाकाहारामुळे बुद्धिमत्ता वाढते, जीवन उन्नत होते. शाकाहारी जीव ओठाने, तर मांसाहारी जीव जिभेने पाणी प्राशन करतो, हे स्पष्ट केले. प्रत्येक जीवाला जीवन जगण्याचा अधिकार आहे. मांसाहार सेवनाने अनेक विकार उत्पन्न होतात. त्यामुळे सर्वांनी शाकाहार व त्याचा प्रचार, प्रसार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
नियमसागर महाराज म्हणाले की, शाकाहारामुळे शरीर निरोगी राहते. आज बाजारात अनेक भेसळयुक्त घातक पदार्थांचा समावेश होत असून, आरोग्याच्यादृष्टीने हा प्रकार मनुष्यासाठी धोकादायक आहे. अनेक महापुरुषांनी अहिंसेचा संदेश देताना त्याप्रमाणे वर्तन ठेवले. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही शाकाहार दिंडी उपयुक्त ठरणार आहे. यावेळी सुरेश पाटील म्हणाले की, अहिंसेचे मूळ शाकाहार हेच आहे. जैन धर्म व अहिंसेचा जवळचा संबंध आहे. भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगाने शाकाहाराचे महत्त्व ओळखले आहे. आभार सुनील पाटील यांनी मानले.
देशातील पहिलेच संमेलन
संयम स्वर्ण पावन वर्षायोगनिमित्त रविवारी देशातील अशाप्रकारचे पहिलेच शाकाहार संमेलन आयोजित केले आहे. रविवारी दुपारी ३ वाजता कल्पद्रुम मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात ‘शाकाहार सर्वोत्तम आहार’ या विषयावर डॉ. कल्याण गंगवाल (पुणे) यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर ‘आयुर्वेद व शाकाहार’ विषयावर डॉ. रावसाहेब पाटील (सोलापूर) व बौध्द साहित्य व शाकाहार विषयावर डॉ. संघप्रकाश दुड्डे (सोलापूर) यांचे व्याख्यान होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, असे सुरेश पाटील यांनी सांगितले.