अनिकेतचा मृतदेह नेण्यास वापरलेली वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:03 AM2017-11-13T00:03:27+5:302017-11-13T00:09:09+5:30

‘थर्डडिग्री’चा वापर करून अनिकेत कोथळे याचा खून केल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पोलिस दलाची बेकर मोबाईल व्हॅन व अनिल लाड याची मोटार तसेच एक दुचाकी अशी तीन वाहने सीआयडीने रविवारी जप्त केली. शहरात विविध ठिकाणी छापे टाकून ही कारवाई केली.

Vehicles used to fetch body of Aniket were seized | अनिकेतचा मृतदेह नेण्यास वापरलेली वाहने जप्त

अनिकेतचा मृतदेह नेण्यास वापरलेली वाहने जप्त

Next
ठळक मुद्देसांगली शहरात विविध ठिकाणी ‘सीआयडी’चे छापे कामटेचे अवैध धंदेवाल्यांशी लागेबांधेदीड महिन्याचे कॉल डिटेल्स काढणार

सांगली : ‘थर्डडिग्री’चा वापर करून अनिकेत कोथळे याचा खून केल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पोलिस दलाची बेकर मोबाईल व्हॅन व अनिल लाड याची मोटार तसेच एक दुचाकी अशी तीन वाहने सीआयडीने रविवारी जप्त केली. शहरात विविध ठिकाणी छापे टाकून ही कारवाई केली.

दरम्यान, कामटेचे अवैध धंदेवाल्यांशी लागेबांधे असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे सीआयडीने त्याचे गेल्या दीड महिन्यातील कॉल डिटेल्स काढण्याचे काम सुरू केले आहे.


कवलापूर (ता. मिरज) येथील संतोष गायकवाड यांना लुबाडल्याप्रकरणी अनिकेत कोथळे व अमोल भंडारे यांना गेल्या सोमवारी पोलिसांनी अटक केली होती. गुन्हे कबूल करण्यासाठी निलंबित पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला व ‘झिरो’ पोलिस झाकीर पट्टेवाले यांनी ‘थर्डडिग्री’चा वापर करून अनिकेतला बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता.

पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जंगलात जाळण्यात आला होता. डीबी रूममधून त्याचा मृतदेह प्रथम बेकर मोबाईल व्हॅनमध्ये घालण्यात आला.

विश्रामबाग येथील एका डॉक्टरकडे तो नेण्याचा प्रयत्न केला. शासकीय रुग्णालयात गेलो तर आपले बिंग फुटेल, असा विचार करून त्यांनी मृतदेहाची सांगलीत विल्हेवाट लावण्याचे ठरवले. यासाठी ते पहाटे चारपर्यंत बेकर मोबाईलमधून मृतदेह घेऊन फिरत होते.


आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे मृतदेह जाळण्याचे ठरविल्यानंतर अनिल लाडने घरातून त्याची मोटार आणली. अंकली-हरिपूर रस्त्यावर बेकर मोबाईल व्हॅन नेण्यात आली. तिथे व्हॅनमधून अनिकेतचा मृतदेह काढून तो लाडच्या मोटारीत ठेवण्यात आला.

सीआयडीने गुन्ह्याच्या तपासात बेकर मोबाईल व्हॅन व लाडची मोटार जप्त केली. तसेच घटना घडल्यानंतर नसरुद्दीन मुल्ला हा त्याच्या दुचाकीवर भंडारेला घेऊन कृष्णा नदीच्या घाटावर बसला होता. त्यामुळे त्याचीही दुचाकी जप्त केली आहे.

लाड व मुल्ला यांनी घराजवळ त्यांची वाहने लावली होती. सीआयडीने छापे टाकून पंचनामा करून ही वाहने जप्त केली आहेत. खुनाच्या गुन्ह्यात आरोपींची वाहने जप्त होतात; पण या प्रकरणात पोलिस दलाची गाडी जप्त होण्याची राज्यातील ही पहिलीच कारवाई म्हणावी लागेल. 

३४ किलोमीटर फिरले

कामटे पथक मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शहर परिसरात पहाटे चारपर्यंत ३४ किलोमीटर फिरल्याचे स्पष्ट झाले आहे. यादरम्यान त्यांनी अनिकेत कोथळे व अमोल भंडारे पळून गेल्याचा बनाव रचला. भंडारे कोणाला दिसू नये, यासाठी नसरुद्दीन मुल्ला त्याला घेऊन कृष्णा घाटावर जाऊन बसला होता, अशी माहिती प्राथमिक तपासातून पुढे आली आहे. अनिकेत मरण पावला आहे, हे बेकर मोबाईल व्हॅनचा चालक राहुल शिंगटे यास माहीत होते. तरीही त्याने कामटेला मदत केली. त्यामुळे त्याच्यावरही खुनाचा गुन्हा दाखल झाला. 
 

धाबे दणाणले


कामटेचे अवैध धंदेवाल्यांशी लागेबांधे होते, अशी माहिती सीआयडीच्या तपासातून पुढे आली आहे. त्यामुळे गेल्या दीड महिन्यातील त्याचे कॉल डिटेल्स काढले जाणार आहेत. संशयास्पद कॉलधारकांना सीआयडीकडून चौकशीसाठी पाचारण केले जाण्याची शक्यता असल्याचे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title: Vehicles used to fetch body of Aniket were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.