विष्णूअण्णा फळ मार्केटमध्ये पाससाठी विक्रेत्यांची झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:28 AM2021-04-20T04:28:58+5:302021-04-20T04:28:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगली शहरात भाजीपाला खरेदीदारांची गर्दी टाळण्यासाठी सोमवारपासून घाऊक भाजी मंडई विष्णूअण्णा फळ मार्केटमध्ये हलविण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली शहरात भाजीपाला खरेदीदारांची गर्दी टाळण्यासाठी सोमवारपासून घाऊक भाजी मंडई विष्णूअण्णा फळ मार्केटमध्ये हलविण्यात आली. फळ मार्केटमध्ये प्रवेश करण्यासाठी लागणारे पास घेण्यासाठी विक्रेत्यांनी गर्दी केल्यामुळे गोंधळ उडाला. सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला. गर्दी पाहून जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी प्रशासनाला गर्दी कमी करण्याच्या कडक सूचना दिल्या. दिवसभरात १५०० विक्रेते, अडत्यांना पास वाटप केले.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. जिल्ह्यात कडक संचारबंदी असून, यातून भाजीपाला, फळविक्रेत्यांसह अत्यावश्यक सेवा वगळल्या आहेत. शहरातील शिवाजी मंडई रविवारी सील करून महापालिका प्रशासनाने येथील सौदे विष्णूअण्णा फळ मार्केट येथे हलविले. पुतळ्यासमोर, तसेच तरुण भारत व्यायाम मंडळाच्या समोरील जागेत रोज घाऊक भाजी मंडई भरते. सोमवारपासून घाऊक फळे, भाजीपाला व्यवहार फळ मार्केटमध्ये करण्याचे आदेश दिले.
सोमवारी सकाळी भाजीपाल्याचा घाऊक बाजार फळ मार्केटला भरविण्यात आला. मात्र, सांगली शहराचे आजूबाजूच्या परिसरातून भाजी खरेदीसाठी येणाऱ्यांची प्रचंड गर्दी झाली. यावेळी अधिकृत पास असल्याशिवाय फळ मार्केटमध्ये प्रवेश न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यामुळे आणखी गोंधळ झाला. पास घेण्यासाठी झुंबड उडाली. संबंधितांकडून आधार कार्ड व दोन फोटो घेऊन पास देण्याची प्रक्रिया सुरू होती. दिवसभरात १५०० विक्रेते, अडत्यांना पास दिल्याचे विष्णूअण्णा फळे व भाजीपाला मार्केटचे सहायक सचिव चंद्रकांत सरडे यांनी सांगितले.
चौकट
भाजीपाला सौद्यामुळे गर्दी
बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी उपायुक्त राहुल रोकडे यांची भेट घेतली. फळे आणि भाजीपाल्याचे सौदे एकत्र निघाल्यास गर्दीत भर पडणार आहे. शिवाजी मंडई येथील भाजीपाला सौदे हलविण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली.
चौकट
फळ मार्केटमध्ये ओळखपत्राशिवाय प्रवेश नाही : जिल्हा उपनिबंधक
फळे आणि भाजीपाला खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याची भीती आहे. विष्णूअण्णा फळ मार्केटमध्ये २१ एप्रिलपासून फळ विक्रेते, व्यापारी व संबंधितांना ओळखपत्राशिवाय प्रवेश मिळणार नाही. वैयक्तिक खरेदीदारास बाजार आवारात प्रवेश बंद आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी सांगितले.