Sangli: व्यंकोचीवाडीत प्रत्येक घरात नऊ दिवस चूल बंद, हनुमान जयंतीनिमित्त अन्नदानाची ऐतिहासिक परंपरा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 05:34 PM2023-04-05T17:34:48+5:302023-04-05T17:35:12+5:30
हनुमान भक्तांचे गाव अशी ओळख
मिरज : हनुमानाच्या भक्तांचे गाव अशी ओळख असलेल्या मिरज तालुक्यातील व्यंकोचीवाडीने आगळीवेगळी ऐतिहासिक परंपरा जपली आहे. रामनवमी ते हनुमान जयंती या नऊ दिवसात गावातील एकाही घरात चूल पेटविली जात नाही. नऊ दिवस गावात अन्नदान करण्यात येते.
केवळ दीड हजार लोकसंख्येच्या गावात हनुमान जयंतीनिमित्त गेल्या पंचवीस वर्षांपासून हनुमान सप्ताह सोहळा सुरू आहे. संपूर्ण नऊ दिवस गावात अन्नदान करण्यात येते. अन्नदानासाठी ग्रामस्थांत चढाओढ होते. चिठ्ठीद्वारे नाव निश्चित करून पुढील वर्षाच्या अन्नदानासाठी योगदान देणाऱ्यांची यादी तयार केली जाते.
या नऊ दिवसात गावात कीर्तन सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, प्रवचन, जागर अन्नदान अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. गेल्या पंचवीस वर्षांपासून ही परंपरा गावाने जपली आहे.
यावर्षीही गावात हनुमान जयंती सप्ताहानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. नोकरी, उद्योगासाठी देश-विदेशात गेलेले गावातील ग्रामस्थ या सप्ताहानिमित्त गावाकडे येऊन सोहळ्यास उपस्थित राहतात. गावातील सर्वच कुटुंबांची हनुमानावर मोठी श्रद्धा असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील मोठा हनुमान जयंती सप्ताह व्यंकोचीवाडी गावात होत असल्याने हनुमान भक्तांचे गाव अशी या गावाची ओळख निर्माण झाली आहे.