'पीएम केअर निधी'तून सांगली जिल्ह्याला मिळालेली 'व्हेंटिलेटर्स' झाले भंगार, कोट्यवधी रुपये मातीमोल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 01:23 PM2022-06-29T13:23:01+5:302022-06-29T13:24:06+5:30
मिळालेली व्हेंटिलेटर्स सुमार दर्जा आणि तांत्रिक बिघाडांमुळे फेकून द्यावे लागले आहेत. शासनाला परत पाठवायचे की भंगारात घालायचे, असा प्रश्न प्रशासनापुढे आहे.
सांगली : कोरोनाकाळात पीएम केअर निधीतून जिल्ह्याला मिळालेले व्हेंटिलेटर्स सध्या भंगार स्वरूपात पडून आहेत. सुमार दर्जा आणि तांत्रिक बिघाडांमुळे फेकून द्यावे लागले आहेत. शासनाला परत पाठवायचे की भंगारात घालायचे, असा प्रश्न प्रशासनापुढे आहे.
एप्रिल २०२१ मध्ये पीएम केअरमधून जिल्ह्याला तब्बल १५२ व्हेंटिलेटर्स मिळाले होते. शासकीय रुग्णालये तसेच काही खासगी कोरोना रुग्णालयांना वितरित करण्यात आले होते. पण बरेच व्हेंटिलेटर्सचे बिनकामाचे ठरले. आरोग्य प्रशासनाने स्थानिक तंत्रज्ञांच्या मदतीने जुगाड करीत सुरू केले, रुग्णांना ऑक्सिजन देऊन जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांची दुरुस्ती स्थानिक स्तरावर शक्य नव्हती; पण कंपनीकडे परत पाठविल्यास लवकर मिळण्याची शक्यताही नव्हती. कोरोनाच्या आणीबाणीच्या काळात काहीही करून वापरात आणण्याचा एकमेव पर्याय होता. त्यामुळे शासकीय रुग्णालयाच्या जैववैद्यकीय (बायोमेडिकल) अभियंत्यांनी कसब पणाला लावून व्हेंटिलेटर्समध्ये प्राण फुंकले.
सेन्सर बंद, सॉफ्टवेअरही जुळेना
काही व्हेंटिलेटरच्या सेन्सरमध्ये बिघाड आहेत. सॉफ्टवेअरमध्येही समस्या आहेत. मिरज कोविड रुग्णालयात २० व्हेंटिलेटर्स बसवले होते, त्यापैकी अनेकांना सॉफ्टवेअरची समस्या होती. तास-दोन तासांतच बंद पडायचे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवावे लागले. दुरुस्तीसाठी कंपनीकडे पाठविणे गैरसोयीचे होते. त्यामुळे राज्य शासनाने प्रत्येक रुग्णालयाला जैववैद्यकीय अभियंते कंत्राटी स्वरूपात नेमण्याचे आदेश दिले. त्याच्याकडून जुगाड करून रुग्णालयांनी वेळ मारून नेली. कवठेमहांकाळ, तासगाव आदी ग्रामीण रुग्णालयांत दुरुस्तीला तंत्रज्ञ नव्हते. त्यांनी सांगली-मिरजेतून मिनतवाऱ्या करून तंत्रज्ञ मिळविले.
जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा
पीएम केअरसाठी लोकांनी भरभरून पैसा दिला; पण त्यातून हलक्या दर्जाची व्हेंटिलेटर्स देऊन कंपन्यांनी उखळ पांढरे करून घेतले. मिरज शासकीय रुग्णालयासह ठिकठिकाणी व्हेंटिलेटर्स वापराविना पडून आहेत. जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला.