नाट्यप्रयोगाची सांगलीच्या दीनानाथ नाट्यगृहात नांदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 01:17 PM2019-01-09T13:17:08+5:302019-01-09T13:20:52+5:30
सदोष ध्वनीयंत्रणा, चुकलेली रचना, ग्रीन रुम्सची दूरवस्था आणि अन्य अनेक गोष्टींमुळे सांगलीच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहांवर नाट्यप्रयोगांनी धरलेला रुसवा आता काही रंगकर्मी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने दूर झाला आहे. खुर्च्यांच्या डागडुजीपासून ध्वनीयंत्रणेपर्यंतच्या सर्व व्यवस्था दुरुस्त करून या रंगकर्मींनी अखेर पु. ल. देशपांडे यांच्या तुझे आहे तुजपाशी या नाटकाचा प्रयोग यशस्वी केला.
अविनाश कोळी
सांगली : सदोष ध्वनीयंत्रणा, चुकलेली रचना, ग्रीन रुम्सची दूरवस्था आणि अन्य अनेक गोष्टींमुळे सांगलीच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहांवर नाट्यप्रयोगांनी धरलेला रुसवा आता काही रंगकर्मी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने दूर झाला आहे. खुर्च्यांच्या डागडुजीपासून ध्वनीयंत्रणेपर्यंतच्या सर्व व्यवस्था दुरुस्त करून या रंगकर्मींनी अखेर पु. ल. देशपांडे यांच्या तुझे आहे तुजपाशी या नाटकाचा प्रयोग यशस्वी केला.
प्रसिद्ध मराठी नाट्यअभिनेते, गायक व संगीतकार असलेले मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने तत्कालिन नगरपालिकेने याची उभारणी केली होती. आता महापालिकेच्या ताब्यात हे नाट्यगृह आहे. यापूर्वी या नाट्यगृहावर नुतनीकरणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च केले, मात्र नाट्यप्रयोगांसाठी आवश्यक असलेल्या गरजा हे नाट्यगृह पूर्ण करू शकले नाही.
महापालिकेवर या नाट्यगृहाच्या कामातून भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यानंतर हे नाट्यगृह पाडून बहुउद्देशीय संकुल व आत्याधुनिक नाट्यगृह उभारणीचा प्रस्ताव काही वर्षापूर्वी सादर झाला होता. त्यावेळी दीनानाथ मंगेशकरांचे पुत्र प्रसिद्ध गायक, संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांनी या गोष्टीस विरोध दर्शविला.
आहे त्याच नाट्यगृहाला अद्ययावत करावे, अशी सूचना त्यांनी मांडली होती. त्यानंतर महापालिकेच्या आजवरच्या कारभाऱ्यांनी कधीच दीनानाथ मंगेशकरांच्या नावचे हे नाट्यस्मारक दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांच्या उदासिनतेमुळे नाट्यगृहाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत गेली. लावणीचे प्रयोग, विविध संस्थांच्या वार्षिक सभा, सभांमधील मारामाऱ्या, खुर्च्यांची फेकाफेक अशाच गोष्टींचा अनुभव या नाट्यगृहाने गेली कित्येक वर्ष घेतला.
आधीच दुर्लक्षित असलेल्या या नाट्यगृहाची अनेक संस्थांच्या सभांनी वाताहत केली. नाट्यप्रयोग होत नसल्याने अनेक रंगकर्मी महापालिकेवर नाराज होते. केवळ नाराजी व्यक्त करण्यापेक्षा काहीतरी कृतीशील पाऊल उचलायला हवे, ही गोष्ट समजल्यानंतर नटराज फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून येथे विनामोबदला राबण्यास सुरुवात केली. खराब झालेल्या खुर्च्या स्वखर्चातून दुरुस्त केल्या.
ध्वनीयंत्रणेचीही डागडुजी केली. ग्रीनरुम्स व अन्य खोल्या व परिसराची त्यांनी कित्येक दिवस स्वच्छता केली. सर्व गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर त्यांनी स्वखर्चातून तुझे आहे तुजपाशी या नाट्यप्रयोगाचे आयोजन केले.
सांगलीकर रसिकांनीही दीनानाथ नाट्यगृहातील या पहिल्या प्रयोगाबद्दल कुतूहल दाखवून गर्दी केली आणि नाट्यप्रयोग यशस्वी झाला. संस्थेचे अध्यक्ष शशिकांत जाधव, सुरज वाघमोडे, अविनाश जोशी, स्वप्नील कोळी, विशाखा पाटील, जगन्नाथ साळुंखे, विक्रम खामकर, सचिन ठाणेकर, कुलभूषण काटे, अपेक्षा चव्हाण, रोहन माने यांनी परिश्रम घेतले.