मणदूरच्या वाड्या-वस्त्यांचा निवडणुकीवर बहिष्कार?
By admin | Published: July 12, 2014 12:21 AM2014-07-12T00:21:37+5:302014-07-12T00:21:57+5:30
ग्रामस्थ आक्रमक : दळणवळणाची सुविधा नसल्याचा निषेध
वारणावती : शिराळा पश्चिम भागातील मणदूर हे ४५०० लोकवस्तीचे निसर्गाच्या कुशीत वसलेले गाव. पैकी ३००० लोकसंख्या मणदूरची, तर उर्वरित १५०० वस्ती चार किलोमीटरवर वसलेल्या मिरुखेवाडी, सिध्देश्वरवाडी, विनोबाग्राम व मणदूरचा धनगरवाडा या वाड्या-वस्त्यांची. या चारही वाड्या-वस्त्यांवर निसर्गाने कृपा केली. मात्र शासन आणि प्रशासनाची मात्र गेल्या १५ वर्षांपासून अवकृपाच झाली आहे.
या वाड्यांना पक्के रस्ते नाहीत. आजही येथे कोणतीच दळणवळणाची सुविधा नाही. सह्याद्रीच्या कड्याकपारीत या वस्त्या आहेत. येथील ग्रामस्थांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी मणदूरला चालत यावे लागते. पावसाळ्यात तर येथे मुसळधार पाऊस पडतो. एखादी व्यक्ती आजारी पडली किंवा महिलेच्या प्रसुतीचा प्रश्न निर्माण झाला, तर पाळणा करुन भर पावसात मणदूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणावे लागते. गेल्या १५ वर्षापासून येथील ग्रामस्थ रस्त्यांअभावी हालअपेष्टांचे जीणे जगत आहेत. येथून साधी दुचाकीही जात नाही. काही रस्ते अर्धवट अवस्थेत आहेत.
मणदूर ग्रामपंचायतीने वारंवार सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंत्यांना रस्त्यासाठी निवेदन दिले, आंदोलनाचे इशारे दिले. मात्र त्याची कोणतीही दखल घेतली गेली नाही. ग्रामपंचायतीने पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून या रस्त्यांचे काम करावे, असा पाठपुरावाही केला. मात्र तोही प्रस्ताव धूळ खात पडला. रस्ताच नसल्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रालाही आरोग्याच्या सुविधा वाड्या-वस्त्यांवर पोहोचवण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
शासन व प्रशासनाने आता लक्ष न दिल्यास येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मिरुखेवाडी, सिध्देश्वरवाडी, विनोबा ग्राम व मणदूर धनगरवाडा ग्रामस्थांनी घेतला आहे. मणदूर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ. सुवर्णा पाटील, उपसरपंच विजय माने, विकास सोसायटीचे अध्यक्ष सावळा पाटील यांच्या उपस्थितीत पांडुरंग सोनवणे, बळवंत मिरुखे, हरिभाऊ मिरुखे, बाळकू डोईफोडे, विठोबा शेळके, मारुती कानवे आदी ग्रामस्थांनी हा मनोदय बोलून दाखवला आहे. (वार्ताहर)