सत्यापन प्रक्रिया बनली सर्वांचीच डोकेदुखी - स्वस्त धान्य दुकानदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 08:03 PM2019-06-20T20:03:10+5:302019-06-20T20:04:16+5:30
स्वस्त धान्य दुकानदार व ग्राहकांना शासनाने सत्यापन करुन घेण्याचे निर्देश दिले आहेत. वास्तविक ही प्रक्रिया २0११ सालापासूनच सुरु आहे. परंतु यातील अनेक जाचक अटी व वारंवार होणाऱ्या सर्व्हर डाऊनमुळे ही प्रक्रिया सर्वांची डोकेदुखी बनली आहे.
इस्लामपूर : स्वस्त धान्य दुकानदार व ग्राहकांना शासनाने सत्यापन करुन घेण्याचे निर्देश दिले आहेत. वास्तविक ही प्रक्रिया २0११ सालापासूनच सुरु आहे. परंतु यातील अनेक जाचक अटी व वारंवार होणाऱ्या सर्व्हर डाऊनमुळे ही प्रक्रिया सर्वांची डोकेदुखी बनली आहे. यामध्ये शासनाने काही बदल करावेत. ही प्रक्रिया गावकामगार तलाठ्यांकडून करुन घ्यावी, अशी मागणी वाळवा तालुका रेशन संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब बी. देशमुख— कोरे यांनी केली आहे.
कोरे म्हणाले, सत्यापन करताना एकाच वेळी कुटुंबातील सर्व सदस्यांनी येणे बंधनकारक आहे. परंतु हे अनेकवेळा शक्य होत नाही. जर शक्य झाले तर सर्व्हर डाऊन असल्याच त्या कुटुबियांना पुन्हा बोलवावे लागते. यामध्ये सर्वांचाच वेळ जातो. पुन्हा पुन्हा सत्यापन प्रक्रियेसाठी येण्यासाठी अनेक कुटुंबिय नकार दर्शवतात. दुकानदारांनी संबंधित कुटुंब प्रमुखाला (शिधापत्रिकेवर महिला कुटुंब प्रमुख आहेत) त्यांना दुकानदाराने सत्यापनासाठी फोन केल्यामुळे वादाचे प्रसंग निर्माण झाले आहेत. तसेच मजुर, लहान मुले, वृध्द यांचे ठसे येत नाहीत. यामुळे ही प्रक्रिया म्हणजे स्वस्त धान्य दुकानदार व ग्राहकांचीही मोठी डोकेदुखी ठरली आहे.
ते म्हणाले, पॉस मशिन वापरातही अनेक त्रुटी आहेत. मशिनमधून कार्डधारकांचा डाटा अचानक एन.पी.एच. मध्ये जातो. तसेच काहींचा डाटा डझनॉट दाखवत असतो. तसेच कुटुंबियांतील काही सदस्यांची नावे दिसतच नाहीत. त्यामुळे युनिटप्रमाणे स्वस्त धान्य देता येत नाही. यामुळेही दुकानदार व ग्राहकांमध्ये तंटे होत आहेत. तसेच दुकानदारांवर फौजदारी गुन्हेही दाखल झाले आहेत. या पॉस मशिनच्या दोषामुळे शासन विनाकारण दुकानदारांना वेठीस धरत आहे, हे चुकीचे आहे.
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने स्वस्त धान्य दुकानदारांबाबत दि. १३ जून रोजी काढलेल्या परिपत्रकामध्ये कार्डधारकांना महिन्याच्या शेवटपर्यंत धान्य उपलब्ध करुन देण्याची सक्ती केली आहे. परंतु स्वस्त धान्य दुकाने सुरु झाली तेंव्हापासूनच ही धान्य वितरणाची पध्दती सुरु आहे. अपवाद वगळता सर्वच दुकानदार महिनाभर धान्याचे वितरण करतात आहेत, असेही बाळासाहेब देशमुख— कोरे यांनी स्पष्ट केले.
शासनाने १ ते ३१ तारखेपर्यंत स्वस्त धान्य वितरण करण्याची सक्ती दुकानदारांवर केली आहे. परंतु १ तारखेला पॉस मशिन शासनाकडूनच सुरु होत नाही. ५ तारखेनंतरच मशिन सुरु होते. त्यामुळे १ ते ५ तारखेदरम्यान आलेल्या ग्राहकांना धान्य पुरवठा करताना अडचणी येत आहेत.