सिंदूरच्या श्रेयाची बुद्धिबळ स्पर्धेत भरारी जिल्ह्याची मान उंचावली : आर्थिक मदतीचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 12:56 AM2018-11-03T00:56:07+5:302018-11-03T00:56:40+5:30
तिचे वय वर्षे अवघे आठ. वडील, मोबाईल आणि संगणक हेच बुद्धिबळाच्या प्रशिक्षणाचे आणि सरावाचे साधन. त्यातून जतसारख्या ग्रामीण भागातील श्रेया गुरू हिप्परगी बुद्धिबळात तरबेज बनली आणि
भागवत काटकर ।
शेगाव : तिचे वय वर्षे अवघे आठ. वडील, मोबाईल आणि संगणक हेच बुद्धिबळाच्या प्रशिक्षणाचे आणि सरावाचे साधन. त्यातून जतसारख्या ग्रामीण भागातील श्रेया गुरू हिप्परगी बुद्धिबळात तरबेज बनली आणि आता ती दि. ३ ते १६ नोव्हेंबरदरम्यान स्पेनमध्ये होणाऱ्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत ताकदीने उतरणार आहे.
जत तालुक्यातील सिंदूर येथील गुरू हिप्परगी सध्या संख येथे माध्यमिक शिक्षक आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेताना बुद्धिबळाची आवड निर्माण झाली. याच खेळाची गोडी मुलगी श्रेयालाही लागावी यासाठी त्यांनी तिला वयाच्या सहाव्या वर्षापासून बुद्धिबळाच्या खेळाचे प्राथमिक धडे देणे सुरू केले. तिला या खेळाची प्रचंड गोडी लागली. त्यानंतर दोन वर्षांत प्रत्येक स्पर्धेत तिने सहभाग घेत यश मिळवले.
सांगली येथे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सहा प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत तिने प्रथम, तर राज्य बुद्धिबळ संघामार्फत मुंबईत झालेल्या ७ वर्षे वयोगटातील स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला. या स्पर्धेत राज्यातील ७० स्पर्धकांनी भाग घेतला होता. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत ७ वर्षे वयोगटाखालील एकूण १२५ स्पर्धकांमध्ये श्रेया दुसरी आली. थायलंडमध्ये १ ते १० एप्रिल या कालावधित झालेल्या ८ वर्षाखालील स्पर्धेत आशिया खंडातील ६० स्पर्धकांमधून श्रेयाने रौप्य व कास्यपदकाची कमाई केली.
थायलंड येथील स्पर्धेसाठी तिला शासनाकडून आर्थिक मदत मिळाली होती. तिच्या कुटुंबियांनी तर दीड लाख रुपये खर्च केले होते. आता पुढील जागतिक स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धा ३ ते १६ नोव्हेंबरदरम्यान स्पेन येथे होणार आहे. यासाठी श्रेयाचा खर्च शासकीय योजनेतून होणार आहे. मात्र इतर खर्च साडेतीन लाखावर जाण्याचा अंदाज आहे. पुढील स्पर्धांसाठी दानशूर व्यक्तींनी तिचे प्रायोजकत्व स्वीकारावे, अशी अपेक्षा गुरू हिप्परगी यांनी व्यक्त केली.जत येथील युथ फॉर जत या संस्थेने तिचा सन्मान सोहळा आयोजित करून स्पेनच्या स्पर्धेसाठी दहा हजाराची मदत दिली.
सरावात बहिणीची साथ
श्रेया हिप्परगी स्पेनमधील स्पर्धेसाठी जोरदार तयारी करत आहे. रोज आठ ते दहा तास सराव सुरू आहे. यात तिची पाचवीत शिकणारी बहीण तिला साथ देत आहे. पहाटे चार वाजता उठून संगणक, मोबाईलवर विश्वनाथन आनंद, गॅरी कास्पोरोव यांसारख्या जागतिक दर्जाच्या बुद्धिबळपटूंच्या खेळातील चालीचा अभ्यास ती करीत आहे.