गांडूळ खत जमिनीसाठी फायदेशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:18 AM2021-07-02T04:18:30+5:302021-07-02T04:18:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : गांडूळ खत वापरामुळे जमिनीचा पोत सुधारतो. पिकांना सुक्ष्म अन्नद्रव्यांची मुबलक प्रमाणात उपलब्धता होऊन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : गांडूळ खत वापरामुळे जमिनीचा पोत सुधारतो. पिकांना सुक्ष्म अन्नद्रव्यांची मुबलक प्रमाणात उपलब्धता होऊन उत्पादनात वाढ होते, असे प्रतिपादन आमदार मानसिंगभाऊ यांनी केले.
चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक कारखान्यात त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन प्रसंगी आ. नाईक बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर प्रमुख उपस्थित होते.
आ. नाईक म्हणाले, रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे हळूहळू कल वाढतो आहे. कारखान्याने यापूर्वी द्रवरूप जैविक खत निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पात तयार होणाऱ्या विविध उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याच्या वापराने उत्पादनात वाढ होत असल्याचे परिणाम दिसून आले आहेत. त्याला पूरक म्हणून आता कारखान्याने गांडूळ खत निर्मिती प्रकल्प उभारला आहे. गांडूळ खत शेतीसाठी उपयुक्त आहे. त्याच्या वापराने जमिनीचा पोत सुधारतो. पिकासाठी अन्नद्रव्यांची मुबलक प्रमाणात उपलब्धता होते. जमिनीत जीवाणूच्या संख्येत वाढ होते. पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. परिणामी उत्पादन वाढून शेतकऱ्यांना फायदा होतो.
प्रारंभी मुख्य शेती अधिकारी विठ्ठल चव्हाण यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यकारी संचालक राम पाटील यांनी प्रास्ताविक केले. कारखान्याचे उपाध्यक्ष, माजी आ. पाटील यांच्या हस्ते गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाचे फीत कापून उद्घाटन झाले. यावेळी संचालक विजयराव नलवडे, विश्वास कदम, सुरेश पाटील, मानसिंग पाटील, बिरुदेव आमरे, विष्णू पाटील, बाळासाहेब पाटील, दत्तात्रय पाटील, कार्यकारी संचालक राम पाटील, सचिव सचिन पाटील यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.