ग्रामविकासाच्यादृष्टीने अत्यंत चांगले पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:19 AM2017-12-30T00:19:56+5:302017-12-30T00:20:25+5:30
सांगली : गावाच्या विकासासाठी चिकाटीने सरपंच व ग्रामपंचायत सदस्य काम करीत असतात. त्यांच्या कामाची नोंद घेतली पाहिजे. ‘लोकमत’ने सरपंचांचा गौरव करून ग्रामविकासासाठी राबणाºयांना सन्मान मिळवून दिला आहे. या पुरस्कारातून सरपंचांना निश्चित पे्ररणा मिळेल. ग्रामविकासाच्यादृष्टीने हे अत्यंत चांगले पाऊल आहे, असे मत पंचायत राज समितीचे माजी अध्यक्ष तथा आमदार शिवाजीराव नाईक यांनी व्यक्त केले.
‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’चा सोहळा सांगलीत थाटात पार पडला. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आ. नाईक बोलत होते. ते म्हणाले की, जिल्ह्यात कृष्णाकाठावरील गावे सधन आहेत, तर पूर्वेला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागतात. अशा विचित्र परिस्थितीतही प्रत्येक गावातील सरपंच विकासासाठी अहोरात्र कार्यरत असतो. त्यांच्या कार्याची नोंद घेण्याची गरज होती. ती ‘लोकमत’च्या माध्यमातून पूर्ण झाली. आज ५० टक्के महिला सरपंच आहेत. चूल व मूल ही परिस्थितीही बदलली आहे. अनेक महिला सरपंच पुरूषांपेक्षा चांगले काम करीत आहेत. थेट सरपंच निवडीमुळे चांगल्या व्यक्ती, महिलेला संधी मिळाली आहे.
गावाचा विकास ठराविक साच्यातून होत होता. रस्ते, गटारी या कामांना शासनाकडून निधी मिळतच राहील, पण या पायाभूत सुविधांपलीकडे जाऊन विचार करण्याची वेळ आली आहे. गावातील नैसर्गिंक साधनसंपत्तीचा विचार करून नवीन उद्योगधंदे उभारले पाहिजेत. तरुणांच्या हाताला काम देण्याचा विचार झाला पाहिजे. शेतीवरील बोजाही कमी करण्याची गरज असल्याचे आ. नाईक यांनी सांगितले.
गावाचे दारिद्र्य संपवा
गावाचा विकास म्हटले की, पाणी, रस्ते, शाळांच्या खोल्या बांधणे, मागासवर्गीय भागात काँक्रिटीकरण करणे, समाजमंदिरे बांधणे इतकाच विचार होतो. त्यापुढे जाऊन ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे की नाही? पायाभूत सुविधा निर्माण होतील. त्यासाठी शासन निधीही देईल. पण गावातील तरुणांना रोजगार दिला पाहिजे. हाताला काम देऊन दारिद्र्य संपविले पाहिजे, असे आ. नाईक यांनी सांगितले.